मध्य रेल्वेने पार्सल गाड्यांद्वारे ६ हजार २४९ टन जीवनावश्यक सामग्री देशभरात पाठवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 07:17 PM2020-05-20T19:17:41+5:302020-05-20T19:18:06+5:30
लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक मालगाडी, पार्सल गाडीद्वारे केली जात आहे.
मुंबई : लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक मालगाडी, पार्सल गाडीद्वारे केली जात आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक येथून देशभरातील कानाकोपऱ्यात ६ हजार २४९ टन जीवनावश्यक सामग्री पाठवल्या आहेत.
देशभर कोरोना विषाणूच्या साथीचा आजार पसरल्यानंतर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला गेला. त्यानंतर पुढील सूचनेपर्यंत सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे मालगाडी, पार्सल गाडी चालविण्यासाठी पुढाकार घेत आहे.
मध्य रेल्वेने औषधे, टपालाची पिशवी, भाजीपाला, खाद्यपदार्थ, दुधाचे पदार्थ आणि अवजड पार्सलही मध्य रेल्वेवरील नागपूर, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर, कलबुरगी, मनमाड, भुसावळ, सीएसएमटी स्थानकांपर्यंत आवक केली आहे. लॉकडाऊन कालावधी मध्य रेल्वेने पार्सल गाड्यांद्वारे मध्य रेल्वेने २ हजार ३७३ टन नाशवंत सामग्री आणि खाद्यपदार्थ, २ हजार ९२८ टन अवजड पार्सल, ८६१ टन औषधे, ५८ टन पोस्टल बॅग आणि २९ टन ई-कॉमर्स उत्पादनांची वाहतूक केली आहे.मध्य रेल्वेकडून चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र टपाल सर्कलने १५ मे पासून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ऑफर करून भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या क्षमता एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीस, भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांमध्ये तसेच दरम्यान उपलब्ध होईल आणि नंतर इतर स्थानकांपर्यंत विस्तारित केली जाईल. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यक्ती आणि व्यावसायिकांना मोठ्या आकाराचे मालवाहतूक करणे कठीण जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. जादा वजनाच्या असलेल्या या वस्तू, ग्राहकांना बुकिंगसाठी टपाल ऑफिस कार्यालयामध्ये नेणे कठीण आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे टपालामधील जड सामग्रीची वाहतूक करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.