मध्य रेल्वेची चित्रीकरण एक्स्प्रेस जोरात; निर्मात्यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला सर्वाधिक पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 06:34 AM2022-03-13T06:34:51+5:302022-03-13T06:36:43+5:30
मध्य रेल्वेला या आर्थिक वर्षात २०२१ - २२ मध्ये विविध ठिकाणी केलेल्या चित्रीकरणातून २.४८ कोटीहून अधिक महसूल मिळाला आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर चित्रीकरण सुरू आहे. तिन्ही ऋतूंमध्ये मध्य रेल्वे मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांवर लघुपट, मालिका, चित्रपट, वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या जाहिरातींचे चित्रीकरण होत आहे. यामध्ये निर्मात्यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. येथे ४ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले.
मध्य रेल्वेला या आर्थिक वर्षात २०२१ - २२ मध्ये विविध ठिकाणी केलेल्या चित्रीकरणातून २.४८ कोटीहून अधिक महसूल मिळाला आहे. यंदा मिळालेला महसूल सर्वाधिक असून जवळपास १० चित्रपटांचे चित्रीकरण या वर्षात करण्यात आले. यामध्ये ६ चित्रपट, दोन वेब सिरीज, एक लघुपट आणि एका जाहिरातीचा समावेश आहे. या आर्थिक वर्षातील सुरुवातीचे ६ महिने कोरोनाचे निर्बंध होते. मात्र, तरीही मध्य रेल्वेला चित्रीकरणातून यंदा २.४८ कोटींचा विक्रमी महसूल मिळाला आहे. यापूर्वी सर्वाधिक महसूल सन २०१३-१४ मध्ये मिळाला होता.