मुंबई : नव्याने सुरु झालेल्या परळ टर्मिनसवरील सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्यरेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर वडाळा डेपोवर बिघाड झाल्याने मोनोरेलचीही वाहतूक खोळंबली आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही सेवांचे कालच उद्घाटन करण्यात आले होते.
मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. आता दुसऱ्या टप्प्यावरील मोनो रेल्वे रविवारपासून धावली. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या टप्पा दोनचे रविवार, ३ मार्चला सायंकाळी ६ वाजता महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौक स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकर्पण करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशीच वडाळा डेपोकडे तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोची वाहतूक बंद झाली. दुपारी 1 च्या सुमारास मोनो सेवा बंद झाली. गेल्या अर्ध्या तासापासून मोनो सेवा बंद झाली आहे. प्रवाशांना तातडीने उतरविण्यात आले.
दरम्यान, एल्फिस्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासन जागे होऊन परळ स्थानकावर अनेक पायाभूत सुविधा सुरू केल्या. यासह दादर स्थानकातील गर्दी कमी करण्याचे उद्देशाने परळ स्थानकाचे रूपांतर परळ ‘टर्मिनस’ मध्ये केले आहे. ३ मार्च रोजी परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे लोकल धावली. रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले.
मोनो रेल्वेचा पूर्ण मार्ग हा १९.५४ किलोमीटर लांबीचा आहे. चेंबूरपासून महालक्ष्मीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी ९० मिनिटे लागत होती. आता दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर यासाठी अवघी ३० मिनिटे लागतील. या टप्प्यावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनोरेल्वे प्रत्येकी २२ मिनिटांनी धावेल.
नवीन रेल्वे रूळ टाकून कल्याणकडे जाणारी नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे. फलाट क्रमांक २ अ ही टर्मिनस मार्गिका आणि फलाट क्रमांक ३ चे रुंदीकरण केले आहे. दोन्ही फलाटावर संरक्षित छत टाकले आहे. १२ मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम जोडणारे पादचारी पूल, सरकते जिने आदी सुविधा प्रवाशांसाठी येथे उपलब्ध आहेत. परळ टर्मिनस पश्चिम रेल्वे मार्गाला जोडत असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे सोपे होईल. परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८.३८ मिनिटांनी चालविण्यात येईल. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.१५ वाजता सुटणार आहे.