मुंबई : करी रोडसह चिंचपोकळी आणि भायखळा स्थानकातील रोड ओव्हर ब्रीजचा (आरओबी) पादचारी भाग कमकुवत असल्याचा शेरा मध्य रेल्वेच्या समितीने दिला आहे. करी रोड स्थानकात लष्करासह मध्य रेल्वेने पूल बांधले. मात्र, ते एकमेकांना जोडत नाहीत. यावर तोडगा काढण्याऐवजी मध्य रेल्वे ‘बघू, करू,’ अशा हवेत वल्गना करत असल्याने, मुंबईतील पूल दुरुस्तीबाबत आणि पुलांच्या समन्वयाबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात मध्य रेल्वे अधिकारी आणि खासदार यांची बैठक बुधवारी पार पडली. या वेळी करी रोड स्थानकातील आरओबीचा पादचारी भाग कमकुवत असल्याचे विचारले असता, मध्य रेल्वे आरओबीवरून प्रवाशांसाठी ‘स्कायवॉक’ बांधण्याचा विचार करत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.शिवाय करी रोड स्थानकात पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा एकही पूल उपलब्ध नाही. सध्या अस्तित्वात असलेले पादचारी पूल हे केवळ फलाटावर उतरतात.भविष्यात पुलावरील चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे, हे प्रश्न उपस्थित केल्यावर रेल्वे अधिकाºयांनी या प्रकरणी केवळ ‘बघू, करू,’ अशी भूमिका घेतली. करी रोडसह चिंचपोकळी, भायखळा येथील आरओबींच्या पादचारी भागाची स्थितीदेखील सारखी असून, भविष्यात दुर्घटना घडल्यास त्यास मध्य रेल्वे जबाबदार असेल, असे खासदार सावंत यांनी सांगितले.मध्य रेल्वे येथे पार पडलेल्या बैठकीत महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, हुसेन दलवाई, उपमहाव्यवस्थापक दिनेश वाशिष्ठ, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत आलेल्या खासदारांनी रेल्वे स्थानक स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. खासदार सावंत यांनी हँकॉक पुलासह अन्य पादचारी पुलांचा प्रश्न उपस्थित केला. मध्य रेल्वेने या प्रश्नाबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. खासदार दलवाई यांनी पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्स, तर खासदार बारणे यांनी प्रवासी सुविधांबाबत विचारणाकेली. सर्व लोकप्रतिनिधींच्यासमस्या आणि प्रश्नांवर मध्य रेल्वे सकारात्मक असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.पुतळ्यासाठी न्यायालयात जाणारछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत मध्य रेल्वेने अजब खुलासा केला आहे. यापूर्वी दर्शनी भागात पुतळा बसविण्याबाबत मध्य रेल्वे सकारात्मक असल्याचे अधिकारी सांगत होते.मात्र, बुधवारच्या बैठकीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत, पुतळा बसविणे शक्य नसल्याचा खुलासा मध्य रेल्वेने केला. यामुळे या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
पादचारी पुलाबाबत मध्य रेल्वे सुस्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:21 AM