Join us

लोकल सुधारण्यासाठी मध्य रेल्वे सरसावली; २८ मेल एक्स्प्रेस वळवणार पाचव्या-सहाव्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 6:51 AM

गोयल यांनी नुकतीच ठाणे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रचंड गर्दीचा अनुभव घेतला.

मुंबई : मेल - एक्स्प्रेसमुळे लोकल वाहतुकीला येणारा अडथळा दूर करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे फलाटांवर होणारी गर्दी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न सुरू केले असून आतापर्यंत फारसा वापर होत नसलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर २८ गाड्या वळवण्यात येणार आहेत. 

ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील अप आणि डाऊन मार्गावरील १८ मेल-एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म ७ आणि ८ वर थांबत आहेत. त्यात आणखी दहा मेल-एक्स्प्रेसची भर पडेल. त्यामुळे गर्दी विभागली जाईल. जलद लोकलचा खोळंबाही टळेल. कल्याण आणि दादर रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनिश गोयल यांनी दिली.

गोयल यांनी नुकतीच ठाणे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रचंड गर्दीचा अनुभव घेतला. गोयल म्हणाले की, ठाण्यातून प्लॅटफॉर्म ५ ते ६ वरून दररोज अप- डाऊन दिशेने ३१० मेल-एक्स्प्रेस जातात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची आणि उपनगरी प्रवाशांची गर्दी होते. ती विभागण्यासाठी १८ रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म सात - आठवर थांबविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी दहा मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्यात येणार आहेत. परिणामी, प्लॅटफॉर्म पाच ते आठवरची गर्दी कमी होण्यास मदत होईल.

कल्याणला कँटीन, कार्यालय हटविणार

कल्याण स्थानकांच्या प्लॅटफ्रॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरील रेल्वे कँटीन आणि रेल्वेचे कार्यालय हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोकळी जागा उपलब्ध होईल. सध्या कल्याण रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येणार आहे. दादर स्थानकाचा विस्तार करणे शक्य नाही; परंतु उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत, असे ते म्हणाले.

स्टॉल हटवणार

ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ५-६, कल्याण प्लॅटफॉर्म क्रमांक ४-५ आणि दादर स्थानकातील ४ प्लॅटफॉर्मवरील स्टॉल हटवण्यात येणार आहेत. सर्व स्टॉलधारकांना पर्यायी जागा सुचविण्याच्या सूचना रेल्वेने केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे स्थानकातील एका प्लॅटफॉर्मवर हा उपाय राबवण्यात येणार आहे. तसेच गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे.

युटीएसची अंतराची मर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव

रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोरील रांगेत उभे राहून तिकीट वा पास काढणारे प्रवासी आता मोबाईल ॲप तिकीट सेवेला पसंती देऊ लागले आहेत; पण सध्या युटीएस ॲपला स्टेशनपासून अंतराची मर्यादा असल्यामुळे मोबाईल तिकीट विक्री मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे युटीएस ॲपचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्ड आणि क्रिसला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहितीही गोयल यांनी दिली.

टॅग्स :मध्य रेल्वेठाणेकल्याण