मध्य रेल्वेवरील दिवा ठरले गर्दीचे स्थानक

By admin | Published: September 24, 2015 01:01 AM2015-09-24T01:01:43+5:302015-09-24T01:01:43+5:30

दिवसेंदिवस अधिकृतबरोबरच अनधिकृत नव्या इमारतींची पडलेली भर यामुळे दिवा स्थानकावर भार वाढत असून, प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे

Central Railway Station | मध्य रेल्वेवरील दिवा ठरले गर्दीचे स्थानक

मध्य रेल्वेवरील दिवा ठरले गर्दीचे स्थानक

Next

मुंबई : दिवसेंदिवस अधिकृतबरोबरच अनधिकृत नव्या इमारतींची पडलेली भर यामुळे दिवा स्थानकावर भार वाढत असून, प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षाची यंदाच्या वर्षाशी तुलना (एप्रिल ते आॅगस्ट) केल्यास तब्बल १२ लाख ७२ हजार नव्या प्रवाशांची भर पडली आहे. त्यामुळे दिवा स्थानकाने सीएसटीसह ठाणे, कल्याण, डोंबिवली स्थानकालाही मागे टाकले असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात.
ठाणे आणि त्यापुढील शहरांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुल उभे राहात आहेत. शहरात घरे परवडणारी नसल्याने मोठ्या संख्येने आता उपनगरांतील घरांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे उपनगरातून शहराकडे येताना लोकल प्रवाशांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसते. कल्याण,डोंबिवली, ठाणे स्थानकांमधून तर जलद लोकलबरोबरच धीमी लोकल पकडणेही अशक्य होते. तांत्रिक कारणांमुळे लोकल उशिराने धावत असल्याने जानेवारी २0१५ मध्ये तर दिवा स्थानकात प्रवाशांच्या उद्रेकाला रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागले. यात धीम्या लोकल गाड्यांना झालेली प्रचंड गर्दी पाहता जलद लोकल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणीही करण्यात आली आणि ही मागणी मान्य करत दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूणच ठाणे आणि त्यापुढील डाऊन मार्गावरील स्थानकांची सद्यस्थिती पाहता गर्दीच्या वेळेत प्रवास करणेही कठीण झाले आहे. यात आता दिवा स्थानकाची भर पडल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. दिवा स्थानकातून २0१४ मध्ये एप्रिल ते आॅगस्टपर्यंत १ कोटी १५ लाख २३ हजार ६६७ प्रवाशांनी प्रवास केला होता. पण २0१५ मध्ये एप्रिल ते आॅगस्टपर्यंतची प्रवासी संख्या पाहिल्यास १ कोटी २७ लाख ९६ हजार २१८ प्रवाशांनी प्रवास केल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. सीएसटी, ठाणे, कल्याणसह डोंबिवली स्थानकालाही दिवा स्थानकाने मागे टाकले आहे. दिवात मोठ्या प्रमाणात वाढत असलेली रहिवास संकुल यास कारणीभूत ठरत असून त्यामुळे दिवा स्थानकावरही त्याचा भार वाढत आहे. यामुळे देण्यात येणाऱ्या सुविधांवरही ताण पडत असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. एप्रिल ते आॅगस्ट २0१५ ची मागील वर्षाच्या एप्रिल ते आॅगस्टपर्यंतशी तुलना केल्यास डोंबिवलीतील प्रवासी संख्या ३.४६, ठाण्याची २.८३, कल्याणची २.९३ टक्के आणि सीएसटीची १४.५८ टक्क्यांनी कमी झाली आहे.

Web Title: Central Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.