लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी कामांच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी दुपारी दोन इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात आले. रुळांच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी डाऊन धिम्या मार्गावर हे ब्लॉक घेण्यात आले असून ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात आल्या. सोमवारी दुपारी देखील दुपारी असे ब्लॉक घेण्यात आले होते. अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
मध्य रेल्वेवर मंगळवारी पहिला ब्लॉक दुपारी १:१२ ते १:३५ या कालावधीत २३ मिनिटांसाठी घेण्यात आला, तर दुसरा ब्लॉक २:३३ ते २:५३ या २० मिनिटांच्या कालावधीत घेण्यात आला होता. माटुंगा, सायन स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे भायखळा स्थानकातून सर्व डाऊन धिम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. पहिल्या इमर्जन्सी ब्लॉक कालावधीत सुमारे आठ लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. दिवा-कोपर सेक्शनमध्ये ओवरहेड वायर तुटल्यामुळे डाऊन लोकल मार्गावरील सेवा प्रभावित झाल्या होत्या. सकाळी ३:१० वाजता ट्रेनचा पेंटो ग्राफ वायरमध्ये अडकल्याने ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती सुरू करून सेवा पूर्ववत केल्या.