Central Railway: रेल्वेच्या ब्लॉकने प्रवाशांना दिला फक्त मनस्ताप!

By सचिन लुंगसे | Published: June 10, 2024 11:15 AM2024-06-10T11:15:50+5:302024-06-10T11:16:14+5:30

Central Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकचा प्रवाशांना दीर्घकालीन फायदा होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला असला तरी ब्लॉकदरम्यान आणि नंतर रेल्वेने प्रवाशांना मनस्तापच दिला आहे.

Central Railway: The block of the railway gave passengers only anguish! | Central Railway: रेल्वेच्या ब्लॉकने प्रवाशांना दिला फक्त मनस्ताप!

Central Railway: रेल्वेच्या ब्लॉकने प्रवाशांना दिला फक्त मनस्ताप!

- सचिन लुंगसे
(वरिष्ठ प्रतिनिधी) 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकचा प्रवाशांना दीर्घकालीन फायदा होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला असला तरी ब्लॉकदरम्यान आणि नंतर रेल्वेने प्रवाशांना मनस्तापच दिला आहे. दुर्दैव म्हणजे ब्लॉक काळात बॅकअप प्लॅन नसणे, बेस्ट, पश्चिम रेल्वेसह उर्वरित यंत्रणांशी मध्य रेल्वेची सांगड नसणे; अशा त्रुटी सातत्याने समोर येत आहेत. या साऱ्यांवर रेल्वेने तांत्रिक कारणे पुढे करत सारवासारव केली असली तरी गेल्या दहा दिवसांत ब्लॉकने प्रवाशांना मनस्तापाशिवाय काहीच दिलेले नाही आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होईल, असा दावा रेल्वे करत असली तरी लोकलमधील गर्दी कशी कमी करणार? याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे खोळंबा मागे ठेवून हा ब्लॉक संपला आहे.

ठाणे येथील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणानंतर प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होईल, असा दावा रेल्वेने केला. मात्र, प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करताना लोकलमधील गर्दी कशी कमी करणार? या प्रश्नाचे उत्तर यंत्रणांकडे नाही. ठाणे येथील ब्लॉकचा पलीकडील प्रवाशांना काडीमात्र फायदा नाही. कारण ठाण्यापुढील पहिल्या लाईनपासून चौथ्या लाईनपर्यंत केवळ लोकल चालविल्या पाहिजेत. पाचव्या सहाव्या लाईनवर मेल/एक्स्प्रेस चालविल्या पाहिजेत. पीक अवरला ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा, अशा शटल सेवा सुरू केल्या पाहिजेत. जेणेकरून लोकलची गर्दी कमी होईल आणि अपघात थांबतील. याकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, ब्लॉकची कामे करताना या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ठाणे येथील ब्लॉकचा प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यापलीकडे काही फायदा झालेला नाही.

सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचा फायदा मेल/एक्स्प्रेसला होणार असला तरी ब्लॉकदरम्यान अद्ययावत करण्यात आलेल्या यंत्रणेला स्थिर होण्यास विलंब होत आहे. सिग्नलनंतरचा वेळ किंवा रेल्वे रूळ बदलल्यानंतर वाढलेल्या वेळेमुळे लोकल सेवेला विलंब होत असल्याचे कारण मध्य रेल्वे पुढे करत असली तरी प्रत्यक्षात ब्लॉकचे काम करताना बॅकअप प्लॅन प्रशासनाकडे हवा होता. त्यादृष्टीने तशी तयारी करायला हवी होती. चाचणी आवश्यक होती. मात्र, या नियोजनाचा ताळमेळ नसल्याने दहा दिवसांपासून मुंबईची लोकल रखडली. रद्द करण्यात आलेल्या मेल/एक्स्प्रेसमुळे कित्येकांचे प्रवासाचे नियोजन फिस्कटले. खोळंब्यामुळे लाखो मुंबईकरांचे आठवडाभर आर्थिक नुकसान झाले. मानसिक त्रास झाला. कित्येक तास प्रवासात खर्ची पडले आहेत. यापैकी एकाचीही भरपाई होणार नसल्याने मध्य रेल्वेने ब्लॉकच्या निमित्ताने मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचा फायदा ठाणे येथे लोकलला तर सीएसएमटी येथे मेल/एक्स्प्रेसला होणार आहे. सीएसएमटीवरील १० आणि ११ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर २४ डब्यांच्या गाड्या थांबविता येतील. प्लॅटफॉर्मवर अधिक जागा उपलब्ध होईल. अपघातांचे धोके कमी होतील. लिफ्ट आणि सरकते जिने बांधण्यात येत असून, पायाभूत सेवा सुविधांचा दर्जा वाढेल. थोडक्यात प्लॅटफॉर्मची लांंबी वाढल्याने गर्दी होणार नाही. गर्दीमुळे प्लॅटफॉर्मवरून कोणी पडणार नाही आणि अपघात कमी होतील, असा दावा रेल्वेने केलेला दावा किती खरा ठरतो, ते लवकरच कळेल.

Web Title: Central Railway: The block of the railway gave passengers only anguish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.