मध्य रेल्वे आणखी १० एसी लोकल चालवणार; ६ नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या दररोज ६६ फेऱ्या
By नितीन जगताप | Published: October 31, 2023 07:32 PM2023-10-31T19:32:27+5:302023-10-31T19:32:42+5:30
साध्या लोकल फेऱ्यांच्या जागी वातानुकूलित लोकल धावणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी ६ नोव्हेंबरपासून आणखी दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/परळ ते कल्याण, अंबरनाथ आणि डोंबिवली दरम्यान या लोकल फेऱ्या धावणार आहेत. यात सर्व धीम्या लोकलचा समावेश आहे. या फेऱ्यांनंतर मध्य रेल्वेवरीलएसी लोकल फेऱ्यांची संख्या ५६ वरून ६६ होणार आहे. साध्या लोकल फेऱ्यांच्या जागी वातानुकूलित लोकल धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १,८१० इतकीच राहणार असून, यात कोणतीही वाढ होणार नाही. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेने एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय होता. मात्र सामान्य लोकलच्या फेऱ्या बंद करून एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास प्रवासी आणि संघटनांकडून विरोध झाला.त्यानंतर काही दिवसात मध्य रेल्वेने आपला निर्णय मागे घेतला होता.
एसी धीम्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक
डाऊन मार्गावरील लोकल
सीएसएमटी कल्याण - सकाळी ८. ४९
सीएसएमटी अंबरनाथ - सकाळी ११. ५८
सीएसएमटी डोंबिवली - दुपारी ४.०१
परळ - कल्याण - सायंकाळी ६. ४०
परळ कल्याण -रात्री ९.३९
अप मार्गावरील लोकल
कल्याण सीएसएमटी - सकाळी ७.१६
कल्याण सीएसएमटी - सकाळी १०.२५
अंबरनाथ सीएसएमटी - दुपारी २. ००
डोंबिवली परळ - सायंकाळी ५. ३२
कल्याण परळ -रात्री ८. २०