Join us

मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, प्रवास करण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 9:29 AM

विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाहीये. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत.

मुंबई- विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाहीये. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत. मध्य रेल्वेची सध्याची वाहतूक ही कुर्ल्यापर्यंतच सुरू ठेवण्यात आली आहे. कुर्ल्याहूनच ठाणे, कर्जत, कसारा लोकल सोडल्या जात आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना कुर्ल्यातच उतरावं लागतंय. त्यातच ओला आणि उबेरने संप पुकारल्यानं प्रवाशांच्या हालाला पारावार उरला नाहीये. सीएसएमटीच्या दिशेने जाणारे हे प्रवासी एका पर्यायी मार्गाचा अवलंब करू शकतात. मध्य रेल्वेवरील प्रवासी घाटकोपरला उतरून मेट्रोने अंधेरीनं पश्चिम मार्गावर जाऊ शकतात. त्या मार्गे ते चर्चगेटला पोहोचू शकतात. 

चर्चगेटमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमचे ऑफिस गाठता येईल. प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट प्रशासनही पुढे सरसावलं आहे. बेस्ट प्रशासनाने कुर्ला, घाटकोपर आणि मुलुंडमधून ज्यादा बसेस सोडण्याचा आदेश जारी केला आहे. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो निष्फळ ठरला आहे. आता या आंदोलनात मनसेनंही उडी घेतली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे. 

काय आहेत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या मागण्या ?

  • रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा
  • रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
  • रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा
  • यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये
टॅग्स :मध्य रेल्वेआंदोलनमुंबई रेल रोको