मुंबई - काही दिवस दडी मारलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरांत पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. सोमवारी ( 2 जुलै ) पासून कोसळणाऱ्या या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकललाही बसला आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला-सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने मध्य रेल्वेचा वेग मंदावला आहे. तसेच 10 ते 15 मिनिटं उशिराने लोकल सेवा सुरू आहे. पश्चिम रेल्वेवर अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली असताना आता मध्य रेल्वेचाही बोजवारा उडाला आहे.
ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेने घाटकोपर आणि सीएसएमटी स्थानकादरम्यान महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गर्दी नियोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अंधेरी स्थानकातील पूल दुर्घटनेमुळे गर्दीच्या वेळेतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच घाटकोपर कुर्ला स्थानकावरील प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.