मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:02 AM2024-06-04T06:02:23+5:302024-06-04T06:03:48+5:30
परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पहाटे ४. ४० वाजता परळ रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ५ वाजल्या पासून मध्य रेल्वेची वाहतूक रखडली आहे. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी व अधिकारी पोहोचले असून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेला जम्बो ब्लॉक दोन दिवसांपूर्वीच समाप्त झाला होता. त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.