मध्य रेल्वे डब्यांच्या संख्येत करणार वाढ, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा
By नितीन जगताप | Published: September 12, 2023 02:43 AM2023-09-12T02:43:48+5:302023-09-12T02:44:44+5:30
मध्य रेल्वेने एलटीटी-मंगळुरु एक्सप्रेस,एलटीटी-कुडाळ एक्सप्रेस आणि दिवा-चिपळूण एक्सप्रेसला अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : अवघ्या काही दिवसनावर गणोशोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र अनेकांना कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एलटीटी-मंगळुरु एक्सप्रेस,एलटीटी-कुडाळ एक्सप्रेस आणि दिवा-चिपळूण एक्सप्रेसला अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही गाड्याच्या अप- डाऊन मिळून एकूण १६ डबे वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सोईस्कर प्रवासासाठी रेल्वेद्वारे गणपती विशेष गाड्या सोडण्यात येतात. मध्य- पश्चिम रेल्वे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१२ गणपती विशेष गाड्या चालविणार येणार आहे. या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना सुविधेसाठी एलटीटी-मंगळुरु एक्सप्रेसला आणखी २ स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता एलटीटी-मंगळुरु एक्सप्रेस एकूण २२ डब्याची होणार आहे. तर एलटीटी-कुडाळ एक्सप्रेसला ही २ स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे त्यामुळे एलटीटी-कुडाळ एक्सप्रेस एकूण २२ डब्याची होणार आहे. याशिवाय दिवा-चिपळूण एक्सप्रेसला अतिरिक्त ४ सामान्य मेमू डबे वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे दिवा-चिपळूण एक्सप्रेस डब्याची संख्या ८ ऐवजी १२ वर पोहचणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवा- चिपळूण गाडी ८ डब्यांची तर दिवा -रत्नागिरी गाडी १२ डब्यांची आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्या १६ डब्यांनी चालवण्यात याव्यात अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता रेल्वेने डब्यांची संख्या वाढविली आहे.