मध्य रेल्वे आणखी वेगाने धावणार; विविध विभागांमध्ये रेल्वेच्या वेगात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:56 AM2024-01-25T09:56:05+5:302024-01-25T09:57:19+5:30
विविध विभागांमध्ये पायाभूत सुविधांची कामे सुरू.
मुंबई : प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, प्रवाशांना वेळेवर गंतव्य ठिकाणी पोहोचता यावे, ट्रेनचा वक्तशीरपणा वाढावा, म्हणून मध्य रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असून, आता त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेने आपल्या काही विभागांत रेल्वेच्या वेगात वाढ केली असून, सुरक्षेच्या सर्व बाबींसह तांत्रिक तपासणी करण्यात आल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या वेगात वाढ करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.
ट्रेनचा वेग वाढविण्यासाठी विविध विभागांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहे. यामध्ये एका विभागात अधिक रूळ टाकणे, ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंगचे काम, तसेच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. रेल्वे रुळांची देखभाल दर्जेदार पद्धतीने केली जात आहे. जुन्या मालमत्तेची पुनर्स्थापना केली जात आहे.
भुसावळ विभाग -
१.जलंब ते खामगाव दरम्यान ५० किमी प्रति तास ते ९० किमी प्रति तासपर्यंत.
२.बडनेरा ते अमरावती दरम्यान ६५ किमी प्रति तास ते ९० किमी प्रति तासपर्यंत.
३. बडनेरा ते चांदूर बाजार मार्गावर १०० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तासपर्यंत.
पुणे विभाग -
१.पुणे ते सातारा दरम्यान १०० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तास
२.सातारा ते मिरज दरम्यान आणि मिरज ते कोल्हापूर दरम्यान १०० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तासपर्यंत.
नागपूर विभाग -
१.माजरी ते पिंपळखुटी दरम्यान ५० किमी प्रति तास ते ९० किमी प्रति तास
२.९० किमी प्रति तासपासून ११० किमी प्रति तास
३. नरखेड ते कोहली दरम्यान (इटारसी ते नागपूर ३री मार्गिका),
४.सिंदी ते बोटी बुरी दरम्यान (नागपूर ते सेवाग्राम ३ री आणि ४ थी मार्गिका)
५.चितोडा ते हिंगणघाट दरम्यान (सेवाग्राम ते बल्लारशाह ३ री मार्गिका)
६.बोटी बुरी ते खापरी दरम्यान (नागपूर ते सेवाग्राम ३ री आणि ४ थी मार्गिका) वर ८० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तासपर्यंत.