मध्य रेल्वेने एसी लोकल सर्वेक्षण मोहीम म्हणजे मुंबईकरांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:35+5:302021-06-17T04:06:35+5:30
मुंबई - मध्य रेल्वेने एसी लोकलबाबत ई-सर्वेक्षण फॉर्म मोहीम सुरू केली आहे; मात्र प्रवासी संघटनेकडून सतत सूचना देऊनसुद्धा ...
मुंबई - मध्य रेल्वेने एसी लोकलबाबत ई-सर्वेक्षण फॉर्म मोहीम सुरू केली आहे; मात्र प्रवासी संघटनेकडून सतत सूचना देऊनसुद्धा याची दखल रेल्वेकडून घेतली जात नाही. फक्त सर्वेक्षणाच्या नावावर मुंबईकरांची दिशाभूल करण्याचे काम रेल्वेकडून केले जात असल्याचा घणाघाती आरोप रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केला आहे.
गेल्या वर्षी मध्य रेल्वेवर पहिली एसी लोकल ट्रान्सहार्बर मार्गावर आणि दुसरी मुख्य मार्गावर धावायला सुरुवात झाली होती; मात्र या दोन्ही लोकलला अत्यंत कमी प्रतिसाद असल्याने प्रवासी वाढवण्यासाठी थेट जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा सुरू केल्या आहे.
रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या ताफ्यात गेल्या वर्षी एसी लोकल दाखल झाली होती. तेव्हा मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात सर्व प्रवासी संघटनेची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सर्व प्रवासी संघटनांनी एकमताने रेल्वेला निवेदन देऊन वातानुकूलीत लोकलचे स्वागत केले होते, तसेच एसी लोकलसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करू नका, १२ डब्याच्या सामान्य लोकलला ३ डबे एसी लोकलचे जोडण्याची विनंती केली होती, तसेच एसी लोकलचे भाडे सर्वसामान्य परवडेल, असे ठेवण्याची सूचना आम्ही केल्या होत्या. त्यानंतरही रेल्वेने एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. सर्वेक्षणानंतर रेल्वेकडून काहीच बदल केलेला नाही. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा एसी लोकल संबंधित ई-सर्वेक्षण फॉर्म मोहीम सुरू केली आहे; मात्र प्रवासी संघटनेकडून सतत सूचना देऊनसुद्धा यांची दखल रेल्वेकडून घेतली जात नाही. फक्त सर्वेक्षणाचा नावावर मुंबईकरांची दिशाभूल करण्याचे काम रेल्वेकडून केले जात असल्याचा घणाघाती आरोप सुभाष गुप्ता यांनी केला आहे.