मध्य रेल्वेचे रडगाणे संपेना; ब्लॉकवर ब्लॉक अन् ‘प्रवासी खोळंब्या’चे अखंडित वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:58 PM2024-10-17T13:58:56+5:302024-10-17T13:59:42+5:30

मागच्या महिन्यात २५ सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे प्रवासी तासन्तास लोकल आणि स्टेशनवर अडकून पडले होते. रुळांवर पावसाळ्यात पाणी साचल्याने दरवर्षी असा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.

Central Railway's cries never end; Block to block and uninterrupted schedule of 'pravasi kholomba' | मध्य रेल्वेचे रडगाणे संपेना; ब्लॉकवर ब्लॉक अन् ‘प्रवासी खोळंब्या’चे अखंडित वेळापत्रक

मध्य रेल्वेचे रडगाणे संपेना; ब्लॉकवर ब्लॉक अन् ‘प्रवासी खोळंब्या’चे अखंडित वेळापत्रक

मुंबई : मध्य रेल्वेवर वारंवार घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे प्रवाशांनाही सतत मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे दर आठवड्याला रविवारच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या  नियोजित ब्लॉकबरोबरच मागील आठवड्यात अचानक सोमवारी १ आणि मंगळवारी २ इमर्जन्सी ब्लॉक घेतल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे चित्र दिसून आले.

मागच्या महिन्यात २५ सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे प्रवासी तासन्तास लोकल आणि स्टेशनवर अडकून पडले होते. रुळांवर पावसाळ्यात पाणी साचल्याने दरवर्षी असा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.  त्यामुळे रेल्वे प्रशासन यावर नेमके कोणत्या उपाययोजना करते की नाही, असा सवालही उपस्थित होतो. मुळात लोकलचा प्रवास स्वस्त व वेळ वाचवणारा असल्याने, रोज सुमारे ३७ लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात; परंतु तांत्रिक अडचणी, बंचिंगमुळे आणि बऱ्याचदा इमर्जन्सी ब्लॉकमुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडते आणि त्याचा परिणाम अर्थातच रेल्वेवर अवलंबून असलेल्या या लाखो प्रवाशांवर होतो. यावर कायमस्वरूपी उपाय होणे अपेक्षित असून दीड शतक जुनी असलेली रेल्वे आता अपग्रेड करणे गरजेचे आहे, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

मध्य रेल्वेवर दररोज दिवसा देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू असतात. या कामांमुळे काही वेळा गाड्यांना उशीर होतो, तर काही गाड्या रद्दही केल्या जातात. जणू ही देखभाल-दुरुस्ती आणि बिघडलेले वेळापत्रक प्रवाशांच्या पाचवीलाच पुजले आहे. मध्य रेल्वे वर्षाला सुमारे ५० ते ६० नियोजित ब्लॉक घेते. यासोबत अनियोजित इमर्जन्सी ब्लॉक असतात ते वेगळेच. त्यामुळे प्रवाशांची या ब्लॉकमधून कधी सुटका होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

मागच्या आठवड्यात मंगळवारी जे ब्लॉक घेण्यात आले होते, ते ब्लॉक डिस्ट्रेसिंगसाठी घेण्यात आले होते. ऊन किंवा थंडीमुळे प्रसरण व  आकुंचन झालेल्या रुळांवरील ताण डिस्ट्रेसिंगमध्ये कमी केला जातो. या कामासाठी एक निश्चित तापमान आवश्यक असते, ज्यामुळे हे ब्लॉक दुपारीच घ्यावे लागतात.
- स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

कामांचा प्रवाशांना फायदा कधी? 
रेल्वेची सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी, तसेच नवे रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी रेल्वेकडून सध्या १६ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीची कामे सुरू आहेत, असे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात मात्र या कामांचा प्रवाशांना थेट फायदा झालेला अद्याप तरी दिसलेला नाही.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
 

Web Title: Central Railway's cries never end; Block to block and uninterrupted schedule of 'pravasi kholomba'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.