मध्य रेल्वेचे ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’, १० महिन्यांत ९५८ मुलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 11:15 AM2024-02-10T11:15:44+5:302024-02-10T11:17:21+5:30
स्वयंसेवी संस्थेची मदत.
मुंबई :मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलींसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन फलाटांवरून सुटका केली आहे. यामध्ये चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली.
काही वाद किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वेस्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या निदर्शनास येत असतात.
हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २८९ मुलांची सुटका केली असून, त्यात १७५ मुले आणि ११४ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने २७० मुलांची सुटका केली. त्यात १६९ मुले आणि १०१ मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागाने २०६ मुलांची सुटका केली असून, त्यात १९८ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागाने १३२ मुलांची सुटका केली असून, त्यात ७६ मुले आणि ५६ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने ६१ मुलांची सुटका केली असून, त्यात ३७ मुले आणि २४ मुलींचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.