Join us

म. रेल्वेच्या ११ फास्ट लोकल आता दादरवरून सुटणार; ७८ गाड्यांचे नवे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 7:53 AM

सुधारित वेळापत्रकानुसार सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि तेथे सेवा समाप्त होणाऱ्या मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेप्रमाणे उपनगरीय सेवांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि तेथे येणाऱ्या ११ जलद लोकल गाड्या दादर स्थानकावर स्थलांतरित केल्या जाणार असून, त्यासाठी तेथील नव्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११ चा वापर करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने या ११ गाड्यांसह एकूण ७८ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. हे नवे वेळापत्रक ५ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

सुधारित वेळापत्रकानुसार सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि तेथे सेवा समाप्त होणाऱ्या मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेप्रमाणे उपनगरीय सेवांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे उपनगरी प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.  

बसण्यास जागा मिळावी यासाठी प्रवासी दादर, भायखळ्यावरून सीएसएमटी गाठतात आणि गाडी पकडतात. सीएसएमटीवरून एकूण २५४ जलद लोकल सुटतात. त्यांतील अनेक लोकल पुरेसे फलाट नसल्याने विलंबाने धावतात. 

कर्जत, कसारा लास्ट लोकल     कर्जतसाठी शेवटची लोकल सीएसएमटीहून रात्री १२:१२ वाजता सुटेल, तर कसाऱ्यासाठी शेवटची लोकल रात्री १२:०८ वाजता सुटेल.     सकाळच्या आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये जलद लोकल गाड्यांना कळवा आणि मुंब्रा येथे अतिरिक्त थांबे दिले जाणार आहेत. 

२४ गाड्या परळ स्थानकातून...    नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकावरून अप आणि डाऊन मार्गावर सुरू असलेल्या २४ गाड्या आता परळ स्थानकातून सुटणार आहेत, तसेच अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या ६ ठाणे गाड्या आता कल्याणपर्यंत धावणार आहेत.     नऊ नवीन गाड्या सुधारित वेळांसह चालवल्या जातील, तर १० सेवा मूळ किंवा टर्मिनेटिंग स्थानकांमध्ये बदलासह चालवल्या जाणार आहेत. 

१७० पैकी १३८ गाड्या सेवेत सध्या मध्य रेल्वेकडे १७० गाड्या असून त्यांपैकी १३८ गाड्या मुंबई आणि महामुंबईकरांच्या सेवेत आहेत. मध्य रेल्वेवर दररोज सुमारे ३७ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करताना रेल्वे सुरक्षा विभागाची तारेवरची कसरत सुरू असते. 

‘डबल डिस्चार्ज’ फलाट    दादर फलाट क्रमांक ८ च्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे.     फलाट क्रमांक १०-११ चे ‘डबल डिस्चार्ज’ फलाटात रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलच्या पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूंनी चढता-उतरता येईल.

टॅग्स :मध्य रेल्वेलोकल