Join us

रुग्णवाहिका चालकांवर मध्य रेल्वेची विशेष ‘मर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:53 AM

आपत्कालीन वैद्यकीय सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकांवर मध्य रेल्वेची विशेष मर्जी असल्याचे वास्तव समोर येत आहे.

मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकांवर मध्य रेल्वेची विशेष मर्जी असल्याचे वास्तव समोर येत आहे. विशेष म्हणजे डॉक्टरसह सर्व वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाच्या तुलनेत सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाला दुप्पट पगार असल्याचे सत्य माहिती अधिकारातून उजेडात आले आहे.रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अपघातप्रसंगी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका तैनात आहे. २००६ सालापासून ही रुग्णवाहिका सीएसएमटी येथे कार्यरत आहे. या रुग्णवाहिकेत डॉक्टरांसह कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन वैद्यकीय सुविधा नाहीत. केवळ मध्य रेल्वेची ही रुग्णवाहिका असल्याने रेल्वे प्रशासनाला रुग्णवाहिकेच्या चालकाला दरमहा ३९ हजार २०० रुपये पगारापोटी खर्च करावे लागत आहेत. या रुग्णवाहिकेच्या चालकांची ड्यूटी केवळ ९ तासांची आहे.याउलट २०१४ सालापासून राज्य सरकारने डॉक्टरांसह सर्व वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली (१०८) रुग्णवाहिका सीएसएमटी स्थानकात सुरू केली. या रुग्णवाहिकेच्या चालकाला केवळ १४ हजार रुपये पगार असून या रुग्णवाहिकेच्या चालकाची ड्यूटी १२ तासांची आहे. मुळात वैद्यकीय सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकावर मध्य रेल्वे का मेहेरबानी दाखवते, असा सवाल समीर झवेरी यांनी उपस्थित केला आहे. क्वचित प्रसंगी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास हाकेच्या अंतरावर असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध होते.>कारवाई करा!रेल्वे सतत तोट्यात असल्याचे सांगितले जाते, असे असतानादेखील अशा खर्चामुळे रेल्वेला आर्थिक फटका बसतो. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी केली आहे.