Join us

लोकल प्रवासास मान्यता दिल्याने केंद्रीय कर्मचारी खुश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 6:24 PM

वेळेत आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने कर्मचारी खूप खुश झाले आहेत.

मुंबई : बस व इतर पर्यायी वाहनांनी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासात जादा वेळ वाया जात होता.  मात्र उपनगरीय लोकलमधून केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मान्यता मिळाली आहे. वेळेत आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने कर्मचारी खूप खुश झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. राज्य सरकारने १ जुलैपासून आयकर विभाग, राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, राज भवन, जीएसटी आणि कस्टम कर्मचारी, सुरक्षा विभाग या निवडक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. 

फिजिकल डिस्टन्सिंग  नियमाचे पालन करण्यासाठी लोकलमध्ये १ हजार २०० लोकांच्या आसन क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०० प्रवाशांना प्रत्येक लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  ज्या स्थानकांवर गाड्या थांबत आहेत.त्या सर्व स्थानकांवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण स्टेशन या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी १ मीटरपेक्षा जास्त अंतरावर गोलाकार चिन्हे काढली गेली आहेत.  रांगा तयार करण्यासाठी आणि गर्दी सहजतेने हाताळण्यासाठी विविध स्थानकांवर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  वैध तिकीटधारक प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट तपासणीसांची नियुक्ती केली आहे.  तिकीट तपासक वारंवार घोषणा करून प्रवाशांना मार्गदर्शन करतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.  ................................ लोकल सुरू झाल्या नव्हत्या, तेव्हा प्रवास करणे खूप अवघड होत होते. आता रेल्वेने राष्ट्रीयकृत बँकिंग कर्मचार्‍यांनाही परवानगी दिली आहे. यासाठी रेल्वे व रेल्वेमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी हरिश्चंद्र मानवडे  यांनी दिली. 

................................ 

रेल्वे प्रशासनाने लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याने केंद्र सरकारचे कर्मचारी खूप आनंदित आहेत, अशी प्रतिक्रिया जीपीओतील कर्मचारी पद्मजा कामत यांनी दिली. 

................................ बसमधून कार्यालयात जाण्यासाठी खूप वेळ लागत असे.  रेल्वेने केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना परवानगी दिली आहे, हे  एक चांगले पाऊल आहे.  रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि भारतीय रेल्वे  यांचे मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया पोस्ट ऑफिसचे कर्मचारी शैलेश गुमरे यांनी दिली.

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसरेल्वेमुंबई