मध्य वैतरणा तलाव काठोकाठ भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:33 AM2018-07-22T05:33:51+5:302018-07-22T05:34:16+5:30
मान्सूनने सोडविला मुंबईकरांचा पाणीप्रश्न; दीड महिन्यातच सर्व प्रमुख तलाव भरले
मुंबई : या वर्षी मान्सूनने मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न जलदगतीने सोडविला आहे. सतत तलाव क्षेत्रात मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने, दीड महिन्यातच सर्व प्रमुख तलाव काठोकाठ भरले आहेत. आतापर्यंत चार तलाव भरले असून, मध्य वैतरणा हा प्रमुख तलावही लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे.
गेल्या दहा दिवसांत एका पाठोपाठ एक तुळशी, मोडक सागर, विहार, तानसा असे चार तलाव भरून वाहू लागले, तर मध्य वैतरणा हा मोठा तलावही काठोकाठ भरला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील अप्पर वैतरणा आणि भातसा हे दोन तलाव साठ टक्क्यांहून अधिक भरले आहेत.
मुंबईला दररोज सुमारे तीन हजार ७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. आजच्या घडीला ८० टक्के म्हणजेच ११ लाख ४३ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे.