Central Vista New Parliament Controversy, BJP vs NCP | भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. २८ मे रोजी होणारा कार्यक्रम रोखण्याच्या विरोधकांच्या मागणीचा NDAच्या प्रेस स्टेटमेंटमध्ये निषेध करण्यात आला. '१९ राजकीय पक्षांचा निर्णय केवळ अनादर करणाराच नाही तर तो देशाच्या लोकशाही मूल्यांचा आणि संवैधानिक मूल्यांचाही घोर अपमान आहे,' असे NDAने म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादीने खोचक टोला लगावला. देशभरात पराभव होईल अशी भीती वाटते म्हणून आता भाजपाला NDAच्या कुबड्यांची गरज पडली का, असा सवाल राष्ट्रवादीकडून विचारण्यात आला.
"१९ पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला उपस्थित न राहिल्याच्या मुद्द्यावर एनडीए म्हणून भाजपने एक प्रेस स्टेटमेंट जारी केल्याने हे दिसून येत आहे की भाजपला २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांच्या स्वयंघोषित अजिंक्यतेवर जिंकण्याची खात्री नाही आणि आता भाजपला एनडीएतील साथीदारांच्या मदतीची आवश्यकता भासत आहे. त्यात म्हटले आहे की हे पक्ष आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांचा आणि घटनात्मक मूल्यांचा अनादर करत आहेत. परंतु भाजपच कलम ७९ चा अवमान करत आहे आणि महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन न करून आपल्या देशाच्या घटनात्मक प्रमुखांचा अनादर करत आहे," असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी ट्विट केले.
आता 'एनडीए'ला महत्त्वा का देता?
"भाजपने प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, विरोधकांनी संसदेतून सभात्याग केला आणि अधिवेशनात व्यत्यय आणला, परंतु जगाने पाहिलेले सत्य हे आहे की, भाजपने संवाद आणि चर्चेविना विधेयके कशी मंजूर केली आणि त्यामुळे माननीय सभागृहाचा व लोकशाही प्रक्रियेचा अपमान केला. कर्नाटकातील निराशाजनक कामगिरी आणि पराभवानंतर भाजप आता कमकुवत पक्ष वाटू लागला आहे आणि त्यांचा 'करिष्मा आणि लाट' याविषयी शंका येऊ लागली आहे, म्हणून प्रश्न, देशव्यापी पराभवापासून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपला आता एनडीएच्या कुबड्यांची गरज वाटत आहे का?" असा खोचक सवाल क्रास्टो यांनी भाजपाला केला.