मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बरवरही उद्या ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 05:17 AM2019-10-19T05:17:12+5:302019-10-19T05:17:26+5:30
दिवाळीच्या खरेदीसाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल; रविवारचे रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच करावे लागणार नियोजन
मुंबई : मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर पायाभूत कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर, तर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक काळात काही लोकलच्या मार्गात बदल केले जातील, तर अनेक लोकल रद्द केल्या जातील. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºया प्रवाशांचे हाल होणार असून, हा त्रास टाळण्यासाठी त्यांना रेल्वेचे रविवारचे वेळापत्रक बघूनच नियोजन करावे लागेल.
मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान रविवार, २० आॅक्टोबरला सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ पर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे सुटणाºया जलद लोकल दिवा ते परळ दरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. या लोकल दिवा ते परळ दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे, सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ पर्यंत पनवेल/बेलापूर ते सीएसएमटी लोकल, तसेच सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी/नेरूळ लोकल सुरू असतील. मात्र, पनवेल ते अंधेरी या मार्गावर लोकल धावणार नाहीत.
ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणे ते पनवेल/बेलापूर दिशेने एकही लोकल धावणार नाही, तसेच सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल ते ठाणे लोकल, सकाळी ११.४५ ते दुपारी २.४५ पर्यंत नेरूळ ते खारकोपर, तर दुपारी १२.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत खारकोपर ते नेरूळ या दरम्यान एकही लोकल धावणार नाही.
पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक असेल. रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाºया धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावतील. ब्लॉक काळात काही लोकल रद्द करण्यात येतील.
रत्नागिरी-दादर पॅसेंजर एक्स्प्रेस दिवापर्यंत
च्रत्नागिरी-दादर पॅसेंजर एक्स्प्रेस रविवारी दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. दिवा येथूनच ती रत्नागिरीला जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी दुपारी ३.४० वाजता दादरहून विशेष लोकल सोडण्यात येईल. ही लोकल दिवा येथे दुपारी ४.१३ वाजता पोहोचेल.