मुंबई - पावसाने जोर धरल्याने काम करणे अशक्य होणार असल्यामुळे रविवारचा मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. परळ स्थानकावर नवीन डाऊन लोकल मार्ग सुरू करण्यासाठी आणि परळ-दादर स्थानकांदरम्यान डाऊन लोकल मार्गावर नवीन रूळ मार्ग टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, पावसामुळे काम लांबणीवर पडले. परिणामी, परळ मध्य मार्गावरील विशेष पॉवर ब्लॉक आणि देखभाल, दुरुस्तीचा ब्लॉक पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. तसचे पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक नसेल.हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगावपर्यंत एकही लोकल धावणार नाही. तसेच पनवेल/बेलापूर/वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत आणि वांद्रे/अंधेरी/गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ वाजेपर्यंत लोकलच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हार्बर लाइनवरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य मार्ग आणि पश्चिम मार्गावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:33 AM