मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा सुरू झाला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी गुरुवारी पुणे विभागाच्या निरीक्षणादरम्यान मिरज रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली, तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी वेबिनारव्दारे स्वच्छता पंधरवड्याचे उद्घाटन केले.
स्वच्छता पंधरवडा १६ ते ३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे, ट्रेन, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये इत्यादी ठिकाणी स्वच्छतेमध्ये दृश्यमान सुधारणा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. मध्य रेल्वे मुख्यालय आणि सर्व विभागांचे रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छतेसाठी वचन दिले आणि स्वच्छतेसाठी दरवर्षी १०० तास म्हणजे आठवड्यातून दोन तास स्वच्छतेसाठी स्वेच्छेने काम करण्यासाठी, एकदाच वापराच्या प्लॅस्टिकविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि स्वत:, कुटुंब, परिसर, गाव आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या पूर्ततेसाठी पुढाकार घेण्याचे वचन दिले. तर पश्चिम रेल्वेच्या वतीने स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.