मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांना आता विमानतळासारखे रूप येणार आहे. आधुनिक प्रकारातील सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय, एटीएमद्वारे पाणी, आकर्षक एलईडी लाइट, लिफ्ट, स्वयंचलित जिने, स्टेनलेस स्टीलची बाके, खाद्यपदार्थांच्या मॉड्यूलर कियोस्कसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जाही उच्च प्रतीचा करण्यात येणार आहे. यासह स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर असताना विमानतळावर आल्याचा भास होईल.
भारतीय रेल्वे स्थानक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे दोन्ही मार्गांवरील स्थानकांचे रुपडे पालटण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण, ठाकुर्ली, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली या स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यात येईल. ही स्थानके दुमजली करण्यात येतील. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन होईल. सुरक्षा व्यवस्थेला बळकटी दिली जाईल. खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी मॉलसारखी दुकाने उभारली जातील. विमानतळासारखा पिक अप आणि ड्रॉप पॉइंट उभारण्यात येणार आहे. बांधा-वापरा-हस्तांतर (बीओटी) या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकावर वेटिंग हॉल, विश्रांती कक्ष यांच्यासह स्वच्छतागृहदेखील विमानतळासारखे आरामदायी आणि सुविधायुक्त बनविले जाईल. ही सर्व कामे रेल्वेची संपत्ती आणि इतर साधनांचा वापर करून केली जाणार आहेत. यासह रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या जमिनीवर व्यावसायिक संपत्ती उभारली जाणार आहे.रेल्वेच्या जमिनीवर इमारती उभारून या जमिनीचा विकास केला जाईल. या कामासाठी अंदाजे २ ते ३ हजार कोटी खर्च येणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पाच वर्षांत विमानतळासारख्या स्थानकावरून प्रवास करता येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.प्रदर्शन आधुनिक स्थानकांचेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर ‘भारतीय रेल्वे : एक यशस्वी प्रवास’ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात भारतीय रेल्वे स्थानक विकास कॉपोरेशन लिमिटेड यांच्या वतीने आधुनिक स्थानक कसे असेल याची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनामध्ये भारतीय रेल्वेमधील १२ झोनमधील स्थानकांना कशा प्रकारे नवे रूप मिळेल, याची माहिती देण्यात आली. यासह प्रवाशांना रेल्वे रूळ न ओलांडण्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले. पश्चिम रेल्वे मार्गावरील सुरत आणि मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर या स्थानकाच्या आधुनिक रूपाची प्रतिकृती प्रदर्शनात उभारली होती.