पश्चिम रेल्वेमार्गावर सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल, निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:33 IST2025-01-20T05:33:23+5:302025-01-20T05:33:45+5:30
Mumbai News: पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार असून, त्याद्वारे ट्रेनचे निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. यामुळे ट्रेनचे संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

पश्चिम रेल्वेमार्गावर सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल, निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार
मुंबई - पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार असून, त्याद्वारे ट्रेनचे निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. यामुळे ट्रेनचे संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
नव्या प्रणालीत सिग्नल, ट्रेनची हालचाल, इंटरलॉकिंग सिस्टमचे निरीक्षण आणि नियंत्रण केंद्रिकृत म्हणजेच एकाच ठिकाणावरून होईल. सध्या पश्चिम रेल्वेच्या ट्रेनचे रूळ बदलायचे असल्यास ट्रेन मॉनिटरिंग सिस्टमचा वापर केला जातो. या प्रणालीत कंट्रोल टॉवरच्या माध्यमातून पॉईंट मशीनला सूचना देण्यात येतात. हे टॉवर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने सूचना अंमलात येण्यासाठी अधिक वेळ खर्च होतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने १७५ कोटी रुपये खर्च करून सीटीसी प्रणाली बसविण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
चर्चगेट ते विरार दरम्यानच्या लोकलचे निरीक्षण सध्या ट्रेन मॉनिटरिंग सिस्टम (टीएमएस) द्वारे केले जाते. विद्यमान प्रणालीला सीटीसीने बदलण्यात येणार असल्याने कंट्रोल टॉवरची गरज भासणार नाही. परिणामी टॉवरच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च वाचणार असून, लोकल आणि एक्स्प्रेसची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी मदत होणार आहे.
- विनीत अभिषेक, सीपीआरओ, पश्चिम रेल्वे
मुंबई येथील टॉवर काढून टाकणार
चर्चगेट, मरीन लाईन्स, मुंबई सेंट्रल, प्रभादेवी, दादर, माहीम, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, भाईंदर, वसई, नालासोपारा आणि विरार.
सेक्शन कंट्रोलर रूळ बदलण्याची सूचना टॉवरला देत असे. त्यानंतर टॉवर ही सूचना पॉइंट मशीनला देत असे. नवीन यंत्रणेद्वारे सेक्शन कंट्रोलर थेट या सूचना पॉइंट मशीनपर्यंत पोहोचविणार आहे.