ठाकरे सरकारनं मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना मदत करावी: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:26 PM2021-06-08T18:26:24+5:302021-06-08T18:28:04+5:30
देशातील १८ वर्षावरील सर्वांचं कोरोना लसीकरण मोफत करण्याचा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील तब्बल ८० कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
देशातील १८ वर्षावरील सर्वांचं कोरोना लसीकरण मोफत करण्याचा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील तब्बल ८० कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचं मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच पंतप्रधानांचा आदर्श घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारनंही राज्यातील गरिबांना मदत करावी, असा सल्ला आठवले यांनी देऊ केला आहे.
18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतलाआहे. या निर्णयामुळे केंद्रावर टीका करणारे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे.महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना त्वरित मदत करावी.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 8, 2021
केंद्रानं जाहीर केलेल्या निर्णयाचं कौतुक करणारं एक ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये राज्य सरकारवरही त्यांनी निशाणा साधला आहे. "१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्रावर टीका करणारे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे. महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना त्वरित मदत करावी", असं ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे.
१८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्य सरकारला मोफत कोरोना लस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. याआधी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिली होती. पण दोनच आठवड्यांत राज्यांनी केंद्राचीच प्रणाली योग्य असल्याचं मत व्यक्त केल्यानं आता केंद्र सरकार या वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं आहे.