मेडिकल कॉलेजमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पुढाकार
By संतोष आंधळे | Published: October 7, 2024 08:29 AM2024-10-07T08:29:29+5:302024-10-07T08:30:39+5:30
याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाने ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अख्यत्यारीतील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय विषयाशी संबंधित विषय कॉलेजेसना देऊन त्या ठिकाणी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यात येणार आहे. या कामाकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, त्याचे मुख्यालय नाशिक येथील विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणाहून अन्य कॉलेजेसचा समन्वय साधण्यात येणार आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनास बळ मिळणार असून, याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाने ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन वाढावे, तसेच काही दुर्मीळ आजारांवरील उपचाराची पद्धती विकसित व्हावी, याकरिता अशा पद्धतीची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ विविध कॉलेजमध्ये निर्माण केली जाणार आहेत. ही व्यवस्था ‘हब अँड स्पोक’ या धर्तीवर राबविली जाणार आहे. यामध्ये मुख्य केंद्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असणार आहे. विद्यापीठातून प्रत्येक कॉलजेला एक विषय देण्यात येईल. त्यावर कॉलेजने काम करणे गरजेचे आहे. अन्य कॉलेजेसना समाविष्ट करून घेणे अपेक्षितआहे. विषयनिहाय या गोष्टी बदलत राहणार आहेत.
कोणत्या कॉलेजला कोणता विषय?
ससून रुग्णालयाला माता आणि बाळ हा विषय असून, त्यासाठी तेथील जेनेटिक सेंटर लॅबची त्यांना मदत घेता येणार आहे. जे जे रुग्णालयाला क्लिनिकल एपिडेमियोलॉजी आणि डेटा सायन्स हा विषय देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ऐरोली येथील केंद्रामध्ये मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयाने दंतरोग या विषयावर काम करणे अपेक्षित आहे. कस्तुरबा रुग्णालयात विद्यापीठाचे साथरोग विषयातील अध्यासन केंद्र आहे. त्या ठिकाणी साथरोग शास्त्रावर संशोधन करण्यात येणार आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि एम्स हे आदिवासी आरोग्य या विषयावर काम करणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील विविध कॉलेजेसमध्ये विविध विषयांचे संशोधन होईल. याचा थेट फायदा रुग्णाच्या उपचार पद्धतीमध्ये होणार आहे. यासाठी शासनाने त्यांना ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. - राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग.
सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी आम्ही अनेक दिवस प्रयत्न करत होतो. सुरुवातीच्या टप्प्यात काही कॉलेजेसची सुरुवात करण्यात आली आहे. त्यांना विशिष्ट विषयाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यापीठात त्याचे मुख्य केंद्र असणार आहे. त्याद्वारे त्यांना प्रशासकीय मदत आणि मार्गदर्शन करणे हे केंद्राचे काम असणार आहे. यामुळे संशोधनास बळ मिळणार आहे. - डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ