लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने सह्याद्री देवराई व सरपंच परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं हा एक अभिनव उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे उपस्थित होते.
अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपण आपल्या गावातील ७५ वर्षीय आणि त्यावरील वयाच्या आजी, आजोबांचा सत्कार करावा आणि त्यांच्याच हस्ते झाडरूपी वारसा पेरावा. त्यांची नातवंडं या झाडांची काळजी घेतील, देखभाल करतील. काही वर्षांनंतर हीच झाडं संपूर्ण गावाची काळजी घेतील. देशाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी राज्यभरात २८,८१३ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या गावांत लोकसहभागातून प्रत्येकी १०० स्वदेशी वाणांच्या झाडांचे रोपण व संगोपन करीत एका नव्या अर्थाने राष्ट्रध्वजास सलामी द्यायचा मानस आहे.
आंबा, जांभूळ, फणस, सीताफळ, बोर, चिकू, पेरूसारखी विविध झाडे विविध संकरित वाणात उपलब्ध आहेत. उपजीविकेसाठी आणि गावाच्या आर्थिक उत्थानासाठी अधिक वाण देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाऊ शकते. तसेच झाडवर्गीय, झडुपवर्गीय, गवत वर्गीय, आदी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. जी गावे पाचशे वृक्ष किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष जोपासतील, त्यांना सह्याद्री देवराईच्या वतीने विशेष गौरव करून सन्मानित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.