मुंबई : वांद्रे ते खारदरम्यान असलेली एक पाऊलवाट तोडून काम मार्गी लावल्यानंतरही स्थानिकांच्या विरोधामुळे अद्यापही पाचवा मार्ग पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेला नाही. हा मार्ग सुरू करण्यासाठी संरक्षण द्या, अशी मागणी पश्चिम रेल्वेकडून शासनाकडे वारंवार करण्यात येत आहे. ही विनंती करूनही शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पश्चिम रेल्वेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.पाचवा मार्ग असलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरीवलीचे काम रेल्वेकडून काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. यातील १९९३ साली मुंबई सेंट्रल ते माहीम टप्पा आणि सांताक्रुझ ते बोरीवली टप्पा २00२ साली पूर्ण करण्यात आला. या कामाला वेग आलेला असतानाच वांद्रे ते खार दरम्यानच्या दीड किलोमीटरच्या टप्प्यात असलेल्या या मार्गाला ट्रॅकजवळील झोपडपट्टीवासीयांनी विरोध केला. एक पाऊलवाट या ठिकाणी असून, ती तोडण्यास विरोध केल्यामुळे हे काम रखडत गेले. त्यानंतर रेल्वेकडून पाऊलवाट तोडून त्या ठिकाणी ट्रॅकचे काम पूर्ण करून आणि स्थानिकांना जवळील अंतरावर फाटकाची व्यवस्था करून पाचवा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात आला. पण स्थानिकांच्या मोठ्या विरोधामुळे मार्ग सुरू करण्यात पश्चिम रेल्वेला अद्यापही यश आलेले नाही. हा मार्ग सुरू झाल्यास मेल-एक्स्प्रेस गाड्यांना सरळ मार्ग मिळेल. गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वेमार्गावरील पाचव्या मार्गावरून सध्या २५ मेल-एक्स्प्रेस गाड्या जातात. या सर्व ट्रेनला वांद्रे ते खारदरम्यान ट्रॅक बदलून जावे लागत असल्यामुळे गाड्यांना लेटमार्क लागत आहे.
पाचव्या मार्गासाठी साकडे
By admin | Published: October 13, 2015 2:31 AM