शंभरीला ‘कला’गुणांचा आधार
By admin | Published: June 14, 2017 12:32 AM2017-06-14T00:32:51+5:302017-06-14T00:32:51+5:30
क्षमता असूनही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी गुणांच्या स्पर्धेत मागे पडत होते. गेल्या काही वर्षांत सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षांमध्ये ९९ टक्के गुण
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्षमता असूनही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी गुणांच्या स्पर्धेत मागे पडत होते. गेल्या काही वर्षांत सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षांमध्ये ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्या तुलनेत महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण कमी होते. पण, यंदा दहावीच्या १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे गुण असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अभ्यासासोबत आपल्याला आवड, रस असलेल्या क्षेत्रातील केलेल्या कलेच्या जोपासनेमुळे अतिरिक्त गुण मिळाल्याने विद्यर्थ्यांना शंभरी गाठता आली आहे.
सीबीएसई, आयसीएसईच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी अधिक असते, त्यापेक्षा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम कमी कठीण असतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. गेल्या काही वर्षांत अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत झालेल्या बदलांमध्ये राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी वाढलेली आहे. विद्यार्थ्यांची क्षमता असूनही त्यांना अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी गुण मिळत असल्यामुळे त्यांचे नुकसान होत होते. आता असे होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले १०० टक्के गुण हे त्यांच्या मेहनतीचे असणार आहेत. या वर्षीपासून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, गायन-नृत्यात पारंगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक पाच गुण देण्यात आल्याने मुलांना १०० टक्के गुण मिळाले असल्याचे शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज म्हणाले की, अनेक विद्यार्थी अभ्यास सांभाळून त्यांचे कलागुण जोपासत होते. त्याच मेहनतीचे फळ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. अनेक विद्यार्थ्यांना कलागुण मिळाल्याने त्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक विद्यार्थी कलांकडे वळतील असा विश्वास वाटत आहे.
- मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत
रेडीज यांनी सांगितले की, सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमुळे त्यांना नामांकित महाविद्यालयामध्ये प्राधान्याने प्रवेश मिळायचा. आता राज्य मंडळाचे विद्यार्थीही त्यांच्याबरोबरीने उभे राहणार आहेत.