Join us

म्युझियम वास्तूची ‘सेंच्युरी’

By admin | Published: November 05, 2014 10:29 PM

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्हणजे भूतकाळात डोकावून पाहण्याचा एक दुवा आहे.

स्रेहा मोरे, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्हणजे भूतकाळात डोकावून पाहण्याचा एक दुवा आहे. भूतकाळातील संस्कृती आणि समाज यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक वस्तू या वस्तुसंग्रहालयात आहेत. विसाव्या शतकातील सांस्कृतिक ठेव्याचा उत्तम नमुना असणारी म्युझियमची ही वास्तू ७ नोव्हेंबर रोजी ‘शंभरी’त पदार्पण करणार असून त्यानिमित्त लंडनचे संशोधक आणि लंडन म्युझियमचे अध्यक्ष जॉन मॅकस्लन उपस्थित राहणार आहेत.म्युझियमच्या शंभरीनिमित्त ‘कंट्युनिटी अ‍ॅण्ड चेंज’ या विषयावर मॅकस्लन यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानातून गतकाळाच्या साथीने भविष्याचा वेध घेण्यात येणार आहे. ७ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता म्युझियम व्हिझिटर्स सेंटर येथे हा कार्यक्रम होईल.संग्रहालयाची वास्तू ही इंडो-सारसॅनिक वास्तुशैलीचा एक अप्रतिम नमुना आहे. १९०९ साली खुल्या स्पर्धेत या इमारतीचे वास्तुशास्त्रज्ञ जॉर्ज विटेट यांची निवड झाली. इन्डो सॅरसेनिक शैलीसाठी विटेट प्रसिद्ध होते. हिंदू व इस्लामी वास्तुशैलींचा मिलाफ तसेच पश्चिमी वास्तुशैलीचे काही गुणदेखील या शैलीत दिसून येतात. मुंबईजवळच उपलब्ध असणारा मालाड येथील बफ दगड व काळा बॅसाल्ट कुर्ला स्टोन या दगडाने संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. १९१४ साली हे बांधकाम पूर्ण झाले; मात्र संग्रहालय जनतेसाठी खुले झाले १० जानेवारी १९२२ या दिवशी. मधल्या काळात या वास्तूचा उपयोग लष्करासाठी इस्पितळ आणि महिला व बालकल्याण केंद्र असा करण्यात आला. त्यानंतर मुंबईचे नामकरण झाल्यावर संग्रहालयाचे नामांतर करून ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ करण्यात आले. वस्तुसंग्रहालयाची ही वास्तू ग्रेड वन प्राचीन इमारत आहे. या वस्तुसंग्रहालयातील कलासंग्रह हा त्याचा प्राण आहे. भारतातील तसेच चीन, जपान आणि युरोपीय देशांतील कलाकृतींचा यात समावेश आहे.