मुंबई - तीस दिवस आणि तेही सकाळ ते संध्याकाळ दरम्यान फक्त उकळलेले पाणी पिऊन उपवास करण्याला जैन धर्मामध्ये मोठे महत्व आहे. अशा तीस दिवसांच्या उपवासाचे शतक करणे ही तर अभूतपूर्व घटना आहे आणि याच अभूतपूर्व घटनेची प्रचिती प.पू.दिव्यतपस्वी जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज यांच्या या शतकी उपवासाने भाविकांना येत आहे. विशेष म्हणजे, आजवर त्यांनी अशाच पद्धतीने १८० दिवसांचे देखील उपवास केले आहेत. ती संख्या देखील सातवर गेली आहे.
जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज यांनी केलेला हा उपवास एक विश्वविक्रम मानला जात आहे. येत्या ३१ मार्च रोजी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे संपन्न होणाऱ्या महातप पारणोत्सव या विशेष कार्यक्रमादरम्यान जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज आपला उपवास सोडणार आहेत. या अलौकीक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केवळ मुंबई व देशातूनच नव्हे तर अमेरिका, युरोप, दुबई, जपान अशा विविध देशांतून हजारो भाविक मुंबईत येणार आहेत.जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज यांचे सेवेकरी प.पू.मुनीराज पद्मकलश महाराज तपस्वी यांनी सांगितले की, जैन धर्मामध्ये उपवासाचे व्रत हे अत्यंत कठीण मानले जाते. सकाळी ९ ते सायंकाळी सहा दरम्यान केवळ उकळलेले पाणी पिऊन हा उपवास केला जातो. इतका कडक उपवास करून जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज यांच्या दैनंदिन साधनेत कोणताही फरक पडलेला नाही.
दिवसाकाठी ते केवळ अडीच तासांची झोप घेतात. तर दिवसातील १५ ते १८ तास ध्यानधारणा करतात. विशेष म्हणजे, त्यांच्या या उपवासाच्या कालावधीमध्ये त्यांनी तब्बल ८०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. मुंबईतून पुण्यापर्यंत व तेथून परत मुंबईत पायी प्रवास त्यांनी केला. पुणे भेटीदरम्यान पुण्यातील अनेक जैन मंदिरांना देखील भेटी देत तिथे प्रवचनाचे कार्यक्रम केले. त्यानंतर मुंबईत देखील विविध ठिकाणी ते भेटी देत आहेत. या उपवासामागचे कारण स्पष्ट करताना पद्मकलश महाराजांनी सांगितले की, सध्या जगात असलेले अस्थिर वातावरण संपुष्टात येऊन विश्वशांती प्रस्थापित व्हावी, तसेच अहिंसेचे धोरण लोकांनी स्वीकारावे, या खेरीज जगात कुणीही उपाशी राहू नये, याकरिता प्रामुख्याने जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज हे ही साधना करत आहेत. तीस दिवसांच्या उपवासाचे शतक करणे ही अलौकीक व अद्भुत घटना आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या कार्यक्रमाचे भाविकांकडून आयोजन करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने त्यांनी विशिष्ट कालावधीसाठी विविध उपवास देखील केले आहेत. ३० मार्च रोजी अनहद नाद हा भक्तीसंध्येचा कार्यक्रम होईल. तर, ३१ मार्च रोजी मुख्य सोहळा सकाळी ९ ते १२.३० दरम्यान पार पडणार आहे.