‘ओटीपी’ शेअर कोणी केला? : पोलिसांनी डॉक्टरांचा जबाब नोंदवला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लस न घेताच प्रमाणपत्र तयार झाल्याप्रकरणी चारकोपच्या चव्हाण हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा जबाब पोलिसांनी मंगळवारी नोंदविला आहे. जोपर्यंत लस घेणाऱ्याच्या मोबाईलवरील ओटीपी ती व्यक्ती शेअर करत नाही तोपर्यंत प्रमाणपत्र सिस्टमवर तयार होत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार नेमका ‘ओटीपी’ कोणी शेअर केला याचा शोध पोलीस आता घेत असून रुग्णालय कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे.
निलेश मेस्त्री (३३) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कोणीही लस घेण्यासाठी येतो त्यावेळी त्याच्या समोरच रजिस्ट्रेशन करत नंतर त्यांच्या मोबाईलवर येणारा ओटीपी त्याला विचारून तो सिस्टममध्ये टाकत पुढील प्रक्रिया केली जाते. हा प्रकार घडला त्या दिवशी चव्हाण हॉस्पिटलमध्ये ५०० लोकांनी नोंदणी केली होती. ज्यात ५३ लोक लस घेण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यानुसार गैरहजर लोकांबाबत सिस्टममध्ये ‘नो डोस’ असा उल्लेख केला जातो. मात्र मेस्त्री वगळता अन्य लोकांकडून अशी तक्रार आलेली नाही. विरारला राहणारे मेस्त्री हे लस घेण्यासाठी पोहोचू शकले नव्हते, तसेच त्यांना लसीसाठीच्या शुल्क आकारण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे लोकेशन आणि सीडीआर पोलीस पडताळून पाहत आहेत. याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी पालिका तसेच सायबर सेलकडे देखील तक्रार दिली आहे.