Join us

गरजूंना खोट्या सह्यांचे प्रमाणपत्र; केईएममधील कर्मचाऱ्याचा प्रताप वैद्यकीय अभिलेख अधिकाऱ्यामुळे उघडकीस

By गौरी टेंबकर | Published: February 26, 2023 8:02 AM

केईएम रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या धोंडिबा बुळे यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वैद्यकीय किंवा दिव्यांगांना लागणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी त्यांच्या कागदपत्रांवर डॉक्टरांच्या खोट्या सह्या करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार परळच्या केईएम रुग्णालयात उघडकीस आला आहे. सूर्यकांत पाटोळे या रुग्णालयीन कर्मचाऱ्यानेच हा प्रताप केल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  केईएम रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या धोंडिबा बुळे यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली. त्यांच्याकडे पोलिस इंज्युरी प्रमाणपत्र, महापालिका वैद्यकीय प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र तसेच रुग्णालयात झालेल्या जन्ममृत्यूच्या नोंदी करून त्या महापालिका वॉर्ड कार्यालयात पाठवणे इत्यादी कामांची जबाबदारी आहे. १५ जून २०२२ रोजी पालिकेचे कर्मचारी प्रकाश वाळुंज हे दिव्यांगांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णालयात आले होते. त्यानुसार त्यांनी त्यांची फाइल प्रकाश मकवाना या अधिकाऱ्याला दिली. मात्र फाइलमध्ये डॉक्टरांचे नाव असलेला पेपर नव्हता. वाळुंज यांच्यावर उपचार सुरू असल्याचे प्रमाणपत्र त्यांना  मिळाले होते.

मकवाना यांना संशय आल्यावर त्यांनी अभिलेख पडताळला. तेव्हा ते प्रमाणपत्र शुभदा माळी नावाच्या महिलेचे असल्याचे आढळले. त्यासंदर्भात वाळुंज यांच्याकडे मकवाना यांनी विचारणा केल्यावर पाटोळे याने पाच हजार रुपये घेऊन ती कागदपत्रे दिल्याचे त्यांनी सांगितले. असाच प्रकार पालिकेत कामगारपदासाठी पात्र ठरलेले उमेदवार नरेंद्र बोरीचा यांच्याही बाबतीत झाला. नोंदणी सहाय्यक मिलिंद परब यांनी बोरीचांना वैद्यकीय प्रमाणपत्र अर्ज देत डोळे, नाक, कान व घसा तज्ज्ञांकडून ते भरून आणण्यास सांगितले. त्यांनी अर्ज भरून परत दिल्यावर त्यावरही दोन्ही ठिकाणी सारख्याच सह्या असल्याचे आढळले. चौकशीत अर्जावर डॉक्टरांनी सह्या केल्याच नसल्याचे उघड झाले. बोरीचा यांनी पाटोळेने त्यांच्याकडून ५०० रुपये घेऊन अर्ज भरून दिल्याचे त्यांनी सांगितले. अखेर धोंडिबा बुळे यांनी  पाटोळे विरोधात तक्रार केली. यासंदर्भात भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :केईएम रुग्णालय