ज्यांच्या खांद्यावर होते खादीचे दुकान त्यांनीच केला वांदा! मुंबई खादी अन् ग्रामोद्योग संघटनेचे प्रमाणपत्र रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:12 PM2022-02-06T12:12:55+5:302022-02-06T12:14:54+5:30

अस्सल खादीच्या नावाखाली बनावट उत्पादने विकणाऱ्या खादी एम्पोरियमवर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कारवाई केली आहे. १९५४पासून मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेतर्फे हे दुकान चालवले जाते आहे.

Certificate of Mumbai Khadi and Village Industries Association canceled | ज्यांच्या खांद्यावर होते खादीचे दुकान त्यांनीच केला वांदा! मुंबई खादी अन् ग्रामोद्योग संघटनेचे प्रमाणपत्र रद्द

प्रतिकात्मक फोटो.

Next

मुंबई:  मुंबईतखादीची खरेदी म्हणजे डॉ. डी. एन. रोडवरील खादी भांडारमधली खरेदी. गेल्या सहा दशकांची ही परंपरा. याच संस्थने चक्क बनावट खादीची उत्पादने विकावीत...हा या दुकानातील कापड म्हणजे खादी हे डोळे झाकून मान्य करणाऱ्यांच्या विश्वासाला मोठा तडाच. ज्यांच्या भरवशावर खादीला बरे दिवस येतील म्हणून, महाग कपडे वाटले तरी लोकांनी खरेदी केले त्यांनीच खादीच्या नावावर हे करावे, या बातमीने मुंबईकरांच्या काळजात धस्स झाले.

अस्सल खादीच्या नावाखाली बनावट उत्पादने विकणाऱ्या खादी एम्पोरियमवर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कारवाई केली आहे. १९५४पासून मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेतर्फे हे दुकान चालवले जाते आहे. तळमजल्यावरील मोठ्या काचांमधून दिसणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याची छाप सोडणाऱ्या वस्तू, सूत कताईचा चरखा, ग्रामोद्यागोतून आलेले लाकडी फर्निचर, जुन्या पद्धतीची वस्तूंची मांडणी. कापडी मोठ्या पिशव्या...असा सगळा माहोल म्हणजे खादी खरेदी. वर्षानुवर्षे तिथे खादीच्या खरेदीसाठी ग्राहक येतात. गांधी जयंतीच्या निमित्ताने लागणाऱ्या सेलचे तर अनेकांना आकर्षण. ऑफिसमध्ये जेवणाच्या सुटीत वेळ काढून येथे लोक खरेदीसाठी हमखास जाण्याचे हे ठिकाण. त्यावरच कारवाई झाली आहे. 

खादीच्या आड बनावट उत्पादनांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कडक धोरण अवलंबले आहे. खादी एम्पोरियममध्ये अस्सल खादी उत्पादनांच्या नावाखाली खादी नसलेल्या उत्पादनांची विक्री होत असल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नियमित तपासणीत अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. नोंदणी रद्द केल्यामुळे खादी एम्पोरियमला अस्सल खादी विक्री केंद्र म्हणून मान्यता राहणार नाही. खादी ब्रँडच्या लोकप्रियतेचा व गैरवापर विश्वासार्हतेचा भंग करून ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल मुंबई खादी व ग्रामोद्योग संघटनेविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार सुरू असल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले.

आतापर्यंत किती कारवाया? : खादी इंडिया हा ब्रँड आणि ट्रेडमार्कचा गैरवापर करणाऱ्यांवर बडगा उगारण्यासाठी आयोगाने कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार आतापर्यंत १२०० हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांना खादीच्या नावाखाली बिगर खादी उत्पादने विकल्याबद्दल कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.

१९५४ मध्ये परवानगी
- केवळ अस्सल खादी उत्पादने विकण्याच्या अटीवर आयोगाने १९५४ मध्ये खादी एम्पोरियमचे संचालन आणि व्यवस्थापन मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेकडे दिले होते. 
- मात्र, अलीकडच्या काही वर्षांत ही संस्था बनावट खादी उत्पादने विकत होती. 
- त्यामुळे हे एम्पोरियम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून चालवले जात असल्याचा समज असलेल्या ग्राहकांची फसवणूक होत होती.
 

Web Title: Certificate of Mumbai Khadi and Village Industries Association canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.