Join us  

अग्निशमनची ‘ना हरकत’ नसताना ताबा प्रमाणपत्र

By admin | Published: May 11, 2017 2:23 AM

गोरेगाव (पश्चिम) येथील नव्वद फुटी रोडवरील एका इमारतीसाठी अग्निशमन दलाचे अंतिम ना हरकत प्रमाणपत्र आणि आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील नव्वद फुटी रोडवरील एका इमारतीसाठी अग्निशमन दलाचे अंतिम ना हरकत प्रमाणपत्र आणि आराखडा उपलब्ध नसताना महापालिकेकडून ताबा प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मुंबई महापालिकेच्या पश्चिम उपनगरे पी वॉर्ड (इमारत प्रस्ताव) विभागाच्या रेकॉर्डवर असलेल्या या इमारतीच्या कागदपत्रांची फाइल पाहण्यासाठी जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मानव जोशी यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. १ए/१/बी/२ असा या जागेचा सीटीएस क्रमांक आहे. फाइलमधील कागदपत्रांचे अवलोकन केले असता, आराखड्यासह अग्निशमन अधिकारी कार्यालायकडून देण्यात येणारे ना हरकत प्रमाणपत्र त्यात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. मात्र, तरीही ६ नोव्हेंबर २0१३ रोजी या इमारतीला ताबा प्रमाणपत्र देण्यात आल्याचेही आढळले. त्यामुळे जनमुक्ती मोर्चाने याबाबत मुख्यमंत्री, तसेच महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे. अग्निशमन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या अंतिम ना हरकत प्रमाणपत्रानुसार, या इमारतीला ताबा प्रमाणपत्र देण्यात आले आहे का, अशी विचारणा करीत ते त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, जर तसे नसेल, तर ताबा प्रमाणपत्र मागे घेण्यात येऊन, याबाबत त्वरित उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात यावी. त्याचप्रमाणे, आपले नाव न देता कागदपत्रे उपलब्ध नसल्याची माहिती देणाऱ्या पहिल्या अपीलीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.