सायन रुग्णालयाच्या प्रयोगशाळेला मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:09 AM2021-08-22T04:09:03+5:302021-08-22T04:09:03+5:30
मुंबई : शहर उपनगरात मागील काही वर्षांत पालिका रुग्णालयातील सेवांचा दर्जा वाढला आहे. कोविड काळात या रुग्णालयांनी संसर्ग नियंत्रणात ...
मुंबई : शहर उपनगरात मागील काही वर्षांत पालिका रुग्णालयातील सेवांचा दर्जा वाढला आहे. कोविड काळात या रुग्णालयांनी संसर्ग नियंत्रणात मोठे योगदान दिले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाने अनोख्या कार्याद्वारे वेगळा मान मिळविला आहे. रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आहे. त्यांना एनएबीएल म्हणजेच नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजकडून सर्व सुविधा संपन्न प्रयोगशाळा म्हणून नामांकन देण्यात आले आहे. असे नामांकन प्राप्त होणारे सायन हे पहिले रुग्णालय ठरले आहे.
लोकमान्य टिळक रुग्णालयात बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि पॅथॉलॉजी अशा तीन प्रयोगशाळा आहेत. त्यातील मायक्रोबायोलॉजी लॅबला एनएबीएलचे नामांकन आधीच प्राप्त झाले होते. उर्वरित दोन प्रयोगशाळांनाही नामांकन प्राप्त झाल्याने या प्रयोगशाळांमध्ये अत्याधुनिक तपासण्या, चाचणीच्या गुणवत्तेबाबतचा दर्जा किती उत्तम आहे हे समोर येते. अत्याधुनिक खासगी प्रयोगशाळांपेक्षा गुणवत्तापूर्ण निकाल देणारी मुंबईतील हे एकमेव रुग्णालय ठरले आहे, असे बायो केमिस्ट्रीचे विभाग प्रमुख डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले.
या प्रयोगशाळेत सर्व अत्याधुनिक चाचण्या वेळेत व अचूक मिळाव्यात, यासाठी हे तीनही विभाग अत्यंत कार्यशील आहेत. तीनही प्रयोगशाळेत दिवसाला ६ हजारांपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत, असे विभाग प्रमुख मायक्रोबायोलॉजी डॉ. सुजाता बावेजा यांनी सांगितले. कोविड काळातदेखील या प्रयोगशाळांचे काम वेगाने सुरू असून मायक्रोबायोलॉजी विभागात कोरोना या आजाराचे सिरो सर्व्हेलन्सचा कार्यक्रम सध्या सुरू असल्याचे डॉ. लीना नाईक, विभाग प्रमुख पॅथॉलॉजी यांनी सांगितले.