२ ऑगस्टपर्यंत मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तांत्रिक कारणामुळे बंद केलेली अकरावी प्रवेशासाठीची अर्जनोंदणी प्रक्रिया राज्य शिक्षण मंडळाकडून सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. दुपारी ३ वाजल्यापासून http://cet.11thadmission.org.in या अधिकृत संकेस्थळावर ही सुविधा उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांना २ ऑगस्ट २०२१, रात्री ११.५९ वाजेपर्यंत सीईटीसाठीची अर्ज नोंदणी करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेस्थळावरही विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
सीबीएसई, आयसीएसई, आयबी व इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरून सीईटी अर्ज नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध केल्यानंतर २८ जुलैपासून त्यांच्यासाठी ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
एसईबीसी विद्यार्थ्यांना खुल्या वर्ग किंवा ईडब्ल्यूएसमधून अर्ज भरावा लागणार
अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षेचे माध्यम निवडावे लागणार असून, सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल तर सामाजिक शास्त्र या विषयासाठी माध्यम निश्चित करावे लागेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीचे अर्ज भरताना एसईबीसी प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग, किंवा ईडब्ल्यूएस यापैकी प्रवर्ग निवडावा लागणार असल्याचेही मंडळाने सांगितले आहे.