अकरावी प्रवेशासाठीची सीईटी जुलैअखेरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:07+5:302021-06-25T04:06:07+5:30
गणित, विज्ञान, इंग्रजी, समाजशास्त्र विषयाला प्राधान्य; प्रत्येकी २५ गुणांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदाच्या अकरावी ...
गणित, विज्ञान, इंग्रजी, समाजशास्त्र विषयाला प्राधान्य; प्रत्येकी २५ गुणांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. ही सीईटी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असली तरी अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ती असेल. परीक्षा जुलैअखेरीस हाेईल. १०० गुणांच्या ऑफलाईन सीईटी परीक्षेत इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
अकरावी प्रवेशासाठी घेतली जाणारी ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली आयोजित होणार असून, या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. परीक्षेसाठीच्या परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषेदेकडून जाहीर करण्यात येईल. दहावीचा निकाल साधारणतः १५ जुलै दरम्यान अपेक्षित असल्याने त्यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजे जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षेच्या आयोजनाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी यासाठी तयारी सुरू करावी, असे अवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
* इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना करावा लागणार राज्य मंडळाचा अभ्यास
शिक्षण विभागाने स्पष्ट केल्याप्रमाणे ही सीईटी सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. मात्र, परीक्षा देताना इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचा दहावीचा अभ्यासक्रम अभ्यासावा लागेल. सीईटी परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामुळे इतर मंडळाचे विद्यार्थी या सीईटीला कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
* राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यर्थ्यांना सीईटीसाठी परीक्षा शुल्क नाही
राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरल्याने त्यांना या परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसई, आयसीएसई, आंतरराष्ट्रीय आणि अन्य मंडळाच्या अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठीचे शुल्क राज्य शिक्षण मंडळ/ परीक्षा परिषदेकडे भरावे लागेल.
प्रवेशासाठी अडचण नाही
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे त्यांच्या सीईटी गुणांच्या निकालावरून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी सीईटी दिली नाही त्यांना अकरावीच्या उर्वरित रिक्त जागांवर त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिले जातील.
विभाग - प्रवेश क्षमता - प्रत्यक्ष प्रवेश - रिक्त जागा
अमरावती - १५३६०- १०९५०- ४४१०
औरंगाबाद - ३१४७०- १६९४८- १४५२२
मुंबई - ३२०७७९- २२४६९५- ९६०८४
नागपूर - ५९२५०- ३४८३४- २४४१६
नाशिक - २५२७०- १९७१२- ५५५८
पुणे - १०७२१५- ७१७२२- ३५४९३
एकूण - ५५९३४४- ३७८८६१- १८०४८३
..........................................................