Join us

अकरावीसाठीची सीईटी जुलैअखेरीस; प्रत्येकी २५ गुणांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 7:14 AM

यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे.

मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. ही सीईटी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असली तरी, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ती असेल. परीक्षा जुलैअखेरीस हाेईल. १०० गुणांच्या ऑफलाइन सीईटी परीक्षेत इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, असे  शिक्षण विभागाने स्पष्ट  केले.

राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली ही  परीक्षा आयोजित होणार असून, या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात येईल. दहावीचा निकाल साधारणतः १५ जुलैदरम्यान अपेक्षित असल्याने, त्यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजे जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षेच्या आयोजनाची शक्यता आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केल्याप्रमाणे ही सीईटी सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. त्यामुळे इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचा दहावीचा अभ्यासक्रम अभ्यासावा लागेल.        

‘त्या’ विद्यार्थ्यांना सूट :

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरल्याने त्यांना या परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. सीबीएसई, आयसीएसई, आंतरराष्ट्रीय आणि अन्य मंडळाच्या अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठीचे शुल्क राज्य शिक्षण मंडळ/ परीक्षा परिषदेकडे भरावे लागेल.

टॅग्स :परीक्षाविद्यार्थी