सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर, ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 07:02 AM2022-03-27T07:02:41+5:302022-03-27T07:02:48+5:30
३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत, अधिकृत माहिती संकेतस्थळावर
मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत सुरू आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी उच्च शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग आणि कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा ३ ते १० जून २०२२, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ११ ते २८ जून तर कलाशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा १२ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. यासोबतच अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक व बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या सीईटी सेलकडून या परीक्षांसाठी अर्ज नोंदणी सुरू आहे. तिन्ही विभागांचे मिळून आतापर्यंत एकूण ४ लाख ५८ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ३ लाख ७० हजार ३०४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन
nविद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सीईटी सेलकडून मदत केली जात आहे. आतापर्यंत ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे दूरध्वनी आले आहेत. त्यातही १२०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उपयुक्त उत्तरे देऊन अडचणी सोडविण्यात सीईटी सेलला यश आले आहे.
nसीईटी सेलने प्रवेश परीक्षेसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ३१ मार्चनंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासहित अर्ज दाखल करता येणार आहेत.
विभाग निश्चित अर्ज स्थिती
एमएचटी सीईटी (पीसीबी) १७५०४१
एमएचटी सीईटी (पीसीएम ) १६८८५३
एमबीए / एमएमएस - १३९९६
एमसीए ३३४२
एचएमसीटी २
एम आर्क ३७
फाईन आर्टस् १४११
बीए बीएससी बीएड १५०
एलएलबी ५ वर्षे ३४६४
एलएलबी ३ वर्षे २५५४
बीपीएड १८७
बीएड १०२६
बीएड एमएड १०२
एमएड ९७
एमपीएड ८९
एकूण ३, ७०, ३०४
८८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली. या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन केले आहे.