Coronavirus: लॉकडाऊनमुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:15 PM2020-03-24T23:15:05+5:302020-03-24T23:16:20+5:30
राज्य आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून निर्णय
मुंबई: सीईटी सेलकडून 13 एप्रिल पासून घेण्यात येणारी एमएचटी सीईटीची परीक्षा पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील आणि देशांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. एमएचटी सीईटीची ही परीक्षा 13 एप्रिल ते 23 एप्रिल 2020 दरम्यान होणार होती.
अभियांत्रिकी , वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्या एमएचटी सीईटी परीक्षांसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यंदा पीसीएम आणि पीसीबी या गटांसाठी स्वतंत्र परीक्षा होणार असून मागील वर्षीपेक्षा दुपटीने अर्ज नोंदणी झाली आहे. राज्यातून तब्बल ५०७९४५ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली असून यंदा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ९६२ आहे. यामुळे अभियांत्रिकी आणि वैद्यकीयच्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी एकूण ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार असल्याची माहिती सीईटी सेलमार्फत देण्यात आली आहे. मात्र आता ही परीक्षा लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली असून पुढील सूचना आल्यानंतरच याबाबतीतील निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता पुढील सूचनांची माहिती संकेतस्थळवर देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
एमसीएची सीईटीही पुढे ढकलली
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एमसीए सीईटी ही पुढे ढकलण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या आधीच जाहीर केला आहे. 28 मार्च रोजी होणारी ती सीईटी 30 एप्रिल रोजी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.