उद्यापासून सीईटी परीक्षेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:41+5:302021-09-19T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा उद्यापासून म्हणजेच सोमवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा उद्यापासून म्हणजेच सोमवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही परीक्षा १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. १५ अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी यंदा ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून, २२० हून अधिक केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. कोरोना निर्बंधांमध्ये निम्म्या म्हणजे २५ हजार संगणकांवर परीक्षा घेणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही सीईटीची परीक्षा होणार असल्याने परीक्षा केंद्रांवर कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अद्याप लोकल प्रवासाची परवानगी नाही, त्यामुळे या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे होता. दरम्यान, राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून रेल्वेला पत्र देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश पत्राच्या साहाय्याने प्रवास करता येणार असल्याची माहिती सीईटी सेल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यंदा नोंदणीत घट ?
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, स्थलांतर करावे लागले, यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना असणारे शुल्क पालकांना भरणे अवघड झाले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणतः ५० हजार ते २ लाख प्रतिवर्ष असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणातून विशेषतः व्यावसायिक शिक्षणाकडे पाठ फिरवली असल्याचे मत महाविद्यालयीन प्राचार्य व्यक्त करीत आहेत. यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची दाट शक्यता आहे.
विद्यार्थीसंख्या
एमसीए – २५,२०८
एमबीए, एमएमएस – १,३२,१९०
एमएचटी-सीईटी – ५,०५,७८८
एलएलबी (तीन वर्षे) – ६८,८७५
एलएलबी (पाच वर्षे) – २४,९७२
बीएड (सर्व) – ७५,७१७