सीईटी टॉपर्सचा जल्लोष
By Admin | Published: June 2, 2016 01:56 AM2016-06-02T01:56:17+5:302016-06-02T01:56:17+5:30
राज्याच्या सीईटीच्या निकालात मुंबईच्या मुलांनी कमालीचे गुण कमावत अव्वल स्थानांवर झेप घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच संबंधित महाविद्यालयांतही बुधवारी जल्लोषाचे वातावरण होते.
मुंबई : राज्याच्या सीईटीच्या निकालात मुंबईच्या मुलांनी कमालीचे गुण कमावत अव्वल स्थानांवर झेप घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच संबंधित महाविद्यालयांतही बुधवारी जल्लोषाचे वातावरण होते.
महत्त्वाची बाब म्हणजे, यंदा लागलेल्या निकालात मुंबईच्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी कमालीचे यश संपादन केले आहे. त्यात वैद्यकीय शाखेमध्ये राज्यात सर्वाधिक गुण मिळवणारे पहिले तीनही विद्यार्थी मुंबईचे आहेत, तर अभियांत्रिकी शाखेतही सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या पहिल्या तिघांपैकी दोन विद्यार्थी हे मुंबईकर आहेत. त्यामुळे सीईटी निकालावर मुंबईतील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची छाप दिसून आली.
मुंबईच्या वांद्रे येथील आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय आणि विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात इतर महाविद्यालयांच्या तुलनेत अधिक जल्लोष होता. कारण या दोनही महाविद्यालयांतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांत पहिल्या तिघांत येण्याची किमया करून दाखवली आहे. साठ्ये महाविद्यालयातील चिन्मय घाणेकर हा विद्यार्थी १९९ गुणांसह अभियांत्रिकी शाखेतून पहिला, तर आदित्य सबनीस हा वैद्यकीय शाखेतून १९९ गुणांसह दुसरा आला आहे. आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या रिषभ रावतने २०० पैकी २०० गुण मिळवत, वैद्यकीय शाखेत पहिला येण्याचा मान मिळवला असून, मानर्थ चौवाला याने १९९ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.
एकंदरीत राज्यातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांच्या सीईटी परीक्षेच्या निकालाची पहिल्या १० विद्यार्थ्यांच्या यादीत, सुमारे ४० टक्के विद्यार्थी मुंबईचे आहेत.
> टॉपर्सना खासगी क्लासेसकडून आमिष
लीनल गावडे ल्ल मुंबई
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थानांवर झेप घेतली. मात्र विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गैरफायदा घेऊन इतर विद्यार्थ्यांकडून पैसा उकळण्यासाठी अनेक खासगी क्लासेसकडून या हुशार विद्यार्थ्यांना आमिषे दाखवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही धक्कादायक माहिती अभियांत्रिकी शाखेत राज्यातून दुसऱ्या आलेल्या केशव जनयानी या विद्यार्थ्याच्या पालकांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
केशवचे वडील मुरली जनयानी यांनी सांगितले की, विविध वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे नाव सांगून काही व्यक्तींनी दुपारी केशवचे छायाचित्र व्हॉट्सअॅप आणि ई-मेल करायला सांगितले. काहींनी तर त्याला प्रसिद्धी देण्यासाठी फोटो हवे असल्याचे सांगितले. शिवाय अधिक चौकशी केली असता, मुंबईतील लहान-मोठ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिरातीत लावण्यासाठी फोटोच्या बदल्यात हजारो रुपये देण्याचे आमिषही दाखवण्यात आले.
केशवसोबतच काही विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर अशी आमिषे आल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचा गैरफायदा घेऊन त्यांच्या जिवावर क्लासेसची पोळी भाजणाऱ्या क्लासेसपासून पालकांनी सावध राहण्याचे आवाहन जनयानी आणि इतर पालकांनी केले आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे फोटो पालकांंनी कोणत्याही वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्राच्या अधिकृत ई-मेल आयडीवरच पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सीईटीच्या निकालानुसारच करिअरच्या दिशा ठरणार होत्या. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यापुढे एम.बी.बी.एस. करायची इच्छा आहे. त्यासाठी केईएम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा आहे. एम.बी.बी.एस.ची पदवी मिळवल्यानंतर स्पेशलायझेशन करायला आवडेल.
- मानर्थ चौवाला, आयईएस एज्युकेशन
सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय
सीईटीच्या उत्तरपत्रिका आल्यानंतर १९७ गुण मिळतील, असा अंदाज आला होता. पण राज्यातून तिसरा येईन, असे वाटले नव्हते. त्यामुळे राज्यातून तिसरा आलो, या बातमीने अधिक आनंद झाला आहे. या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांची मेहनत आहे. त्यांच्या विश्वासाला पुरेपूर न्याय देऊ शकलो, याचे समाधान आहे. पुढे आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
- केशव जनयानी, पीपल्स एज्युकेशन
सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय,