‘सीईटी’ ठरणार विद्यार्थ्यांसाठी अग्निदिव्य, विद्यार्थ्यांवर दडपण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:28 AM2021-06-27T07:28:32+5:302021-06-27T07:29:10+5:30
राज्य मंडळाचा अभ्यासक्रम अनिवार्य : परीक्षेसाठी पुरेसा वेळ नसल्याने विद्यार्थ्यांवर दडपण
सीमा महांगडे
मुंबई : यंदा अकरावी प्रवेशासाठी सर्व मंडळाच्या आणि माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. सदर सीईटी परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्यामुळे सीईटी देताना सीबीएसई, आयसीएसई, आंतरराष्ट्रीय आणि इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचा दहावीचा अभ्यासक्रम अभ्यासावा लागणार आहे. त्यातच परीक्षेसाठी अवधी कमी राहिल्याने अभ्यास करणे विद्यार्थ्यांसाठी ‘अग्निदिव्य’ ठरणार आहे. त्यामुळे सर्व मंडळाच्या गुणवत्ता समान पातळीवर कशी राखता येणार, असा प्रश्न हे विद्यार्थी पालक विचारत आहेत.
अकरावी प्रवेशासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी ही सीईटी देण्यासाठी पात्र असणार आहेत. आकडेवारीनुसार यंदा राज्य शिक्षण मंडळाचे दहावीचे तब्बल १६ लाख विद्यार्थी आहेत, तर आयसीएसई, सीबीएसई आणि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा विचार केल्यास ही संख्या एक लाखाहून अधिक आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या पटीने निश्चितच १५ ते १६ पटीने अधिक आहे. शिवाय अकरावीनंतर इतर कोणत्याही मंडळाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी राज्य शिक्षण मंडळाचाच अभ्यास करणे अनिवार्य असल्याचे मत मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी व्यक्त केले.
सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे विद्यार्थी हे त्यांच्या दहावीच्या परीक्षेत समाजशास्त्रासारखे विषय पर्यायी म्हणून ठेवतात. अशावेळी अशा विषयांवर आधारित सीईटी विद्यार्थ्यांना देणे कठीण जाऊ शकते, असे मत स्कूल लिडर फाउंडेशन संस्थेचे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ असलेल्या फ्रान्सिस जोसेफ यांनी व्यक्त केले. अकरावी प्रवेशाची सीईटी ऐच्छिक असल्याने सीबीएसई आणि इतर मंडळाचे किती विद्यार्थी ती देणार आणि अकरावी प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे इतर मंडळे आणि राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये चुरस किती रंगणार यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशसंख्या, इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या यामध्ये मोठी तफावत आहे. सीईटीसाठी निवडलेले विषय आणि निकष हे सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरतील, हा विचार करूनच निश्चित केलेले आहेत. तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू करावी.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ