बोईसर : येथील तारापूर एम.आय.डी.सी मधून सोडण्यात आलेल्या रासायनिक प्रदूषीत सांडपाण्यामुळे सोमवारी रात्री पासून नवापूरच्या खाडीकिनारी हजारो मासे मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे नवापूरच्या संतप्त ग्रामस्थांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाऊन तेथील प्रक्रिया बंद पाडुन तेथेच ठिय्या मारला. जोपर्यंत आमची गाऱ्हाणी ऐकून लेखी आश्वासन देत नाहीत तो पर्यंत सीईटीपीमधील ठिय्या कायम ठेवण्याचा निर्धार केला. परंतु दुपारपर्यंत एमपीसीबीचे अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाहीततारापूर एम.आय.डी.सी मध्ये रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २५ एम.एल.डी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. त्या प्रक्रिया केंद्रात क्षमतेच्या दुप्पट रासायनिक प्रदूषीत सांडपाणी येत असल्याने अतिरीक्त सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने नवापूर, मुरबे, दांडी, उच्छेळी या समुद्रकिनारी प्रदूषीत पाण्यामुळे नेहमीच मासळीच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्यावर परंपरागत मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेकडो कुटूंबावर नेहमीच टांगती तलवार असते. तर प्रदुषीत पाण्यामुळे मासळीच्या अनेक जातीही नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. मंगळवारी सकाळी नवापूरच्या सरपंच अंजली बारी यांच्या नेतृत्वाखाली नवापूरचे ग्रामस्थ सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाऊन त्या कार्यालयातील टेबलावर मृतमासे ठेवुन आपला संताप व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापुर विभागाच्या अधिकाऱ्यांना सीईटीपी मध्ये ग्रामस्थांनी बोलवण्यात आले होते. परंतु, तेही दुपारपर्यंत तेथे आले नसल्याने ग्रामस्थ अधिकच संताप व्यक्त करीत होते. (वार्ताहर)
नवापूरमध्ये सीईटीपी प्रक्रिया पाडली बंद
By admin | Published: November 05, 2014 5:04 AM