लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील (सीएफसी) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रात कर भरणा करण्यासाठी केंद्रांमध्ये नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह २५ विभाग कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रे आहेत. येथे विविध प्रकारच्या करांचा भरणा केला जातो. ही केंद्र चालविण्यासाठी एका खासगी कंपनीची सेवा घेण्यात आली आहे. कंत्राटदाराने कंपनीच्या सुमारे १७४ कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम थांबविले आहे. प्रत्येक केंद्रात पालिकेने आपले दोन कर्मचारी नेमले आहेत. मात्र, या केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी असल्यामुळे कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यामुळे कर भरणा करण्यासाठी आलेल्य़ा कर्मचाऱ्यांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते.