मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना चांगलाच टोला लगावला. बालभारती पुस्तकातील वादावरुन फडणवीस यांनी अजित पवारांना उत्तर देताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख करत खिल्ली उडवली. विशेष म्हणजे, या नावाचा कुणाशीही संबंध जोडू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणिताच्या पुस्तकातील बदलला आपला विरोध दर्शवला. शिक्षण पद्धतीतील हा बदल स्वागतार्ह नसल्याचे पवार यांनी म्हटले होते. तसेच, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच हा निर्णय घेतला असेल, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून शिक्षण खाते काढून घेतल असेल. त्यामुळे, नवीन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी बालभारती आणि गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाचा हा बदल रद्द करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणीही अजित पवार यांनी विधानभवनात केली होती. तसेच, हा प्रश्न विचारताना, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची खिल्लीही उडवली.
नवीन बदलानुसार, ऊर्जामंत्री बावनकुळे साहेबांना बोलवताना आम्ही... वो पन्नास दोन कुळे साहेब.... पन्नास दोन कुळे साहेब आले बघा... असं म्हणायचं का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, मुख्यमत्री महोदयांचं नाव घेताना, फडण दोन-शून्य असं म्हणायचं का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर, सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. अजित पवारांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. बालभारती मराठीच्या पुस्तकातील काही वाक्यांचे वाचन करत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना टोला लागवला. आई कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण असे पाठ्यपुस्तकातील उतार्यांत असलेले वाक्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वाचले. त्यामुळे सभागृहात सर्वच आमदारांना हसू अनावर झाल्याचे दिसून आले. मात्र, त्याचवेळेस संख्यावाचनाच्या पद्धतीबाबत जर सदस्यांचे आक्षेप असतील तर तज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.